सारा अली खान गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक; आईसोबत घेतले दर्शन

 
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या इंदूरमध्ये विकी कौशलसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तिने आई अमृता सिंहसोबत खजराना गणेश मंदिरात दर्शन घेतले. दर्शन घेतानाचे फोटो तिने इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत.

दर्शन घेताना ती भक्तीत तल्लीन झालेली पहायला मिळाली. कपाळाला कुंकू आणि हातात माळा पकडलेला सारा अली खानचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी सारा मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारामध्ये सुद्धा नेहमीच जात असते. या अगोदर ती उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेली होती. त्यावेळी सुद्धा तिची आई अमृता सिंह तिच्यासोबत होती.

चित्रपटांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास नुकतीच अक्षय कुमारच्या अंतरंगी रे या चित्रपटात ती दिसली होती. तिच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. सध्या ती विकी कौशलसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा येणारा चित्रपट कार्तिक आर्यन आणि कृती सेननच्या लुकी छुपी या चित्रपटाचा सिक्वल असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतीत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.