दिल्ली पोलिसांनाही विकी-कॅटच्या लग्नाची भुरळ!, म्हणाले...
कर्ज काढून का होईना पण धूमधडाक्यात अगदी आसपासच्या गावांनाही लक्षात राहील, असे लग्न करण्याची हौस अनेकांना असते. त्यांच्यासाठी नुकतेच झालेले अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचे लग्न एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहे. कॅट-विकी ज्या पद्धतीने सुरक्षितता राखत विवाहबंधनात अडकले, त्या पद्धतीचे अगदी दिल्ली पोलिसांनीही कौतुक केले असून, आपला पासवर्ड सुरक्षित राखण्याचा सल्ला दिल्लीकरांना देताना त्यांनी कॅट-विकीच्या लग्नासारखाच आपला पासवर्ड सुरक्षित ठेवा, असे आवाहन केले.
दिल्ली पोलिसांच्या या आवाहनाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत कॅट-विकीने लग्न केले. लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही त्यांनी आपले मोबाइल आणि कॅमेरा हॉटेलच्या खोलीतच सोडण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून लग्नाची छायाचित्रे कुणी घेऊ नये. दिल्ली पोलीस लग्नातील सुरक्षा व्यवस्था पाहून आश्चर्यचकीत झाले.
त्यांनी कौतुक करत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शुक्रवारी राजस्थानच्या सवाई माधोपुर येथील सिक्स सेंस फोर्टमध्ये हा लग्नसोहळा झाला. हॉटेलमध्ये बाहेर दोघांचेही अनेक चाहते हजर होते. जे नवविवाहित दाम्पत्याचे फोटो घेण्यास उत्सुक होते. विशेष म्हणजे एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात दोघे जण लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसले.