..म्‍हणून द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले!

 
सध्या देशभरात द काश्मीर फाईल्स चित्रपटाची चर्चा होत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्‍याचारावर हा चित्रपट बेतलेला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा देशवासीयांनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन केले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चित्रपटाची प्रसिद्धी करायला सुरुवात केली आहे. काही नेते तर स्वतःच्या खर्चातून दर्शकांना चित्रपट दाखवत आहेत. या प्रकारावर मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चिडले असून, त्‍यांनी फुकट चित्रपट दाखवू नये, असे आवाहन केले.

हरियाणातील रेवाडीचे भाजप अध्यक्ष केशव चौधरी यांनी त्यांच्या जिल्ह्यात फुकटात चित्रपट दाखविण्याची घोषणा केली. यासाठी चौधरी यांनी प्रसिद्धीसाठी एक बॅनर तयार केले. २० मार्चला २० बाय १० च्या स्क्रीनवर सिनेमा मोफत दाखविण्याची घोषणा त्यांनी केली आहे. दरम्यान, चौधरी यांनी तयार केलेले हे बॅनर विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या व्टिटर खात्यावर शेअर केले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे अग्निहोत्री यांनी तक्रार केली असून, असे चित्रपट फुकट न दाखविण्याची विनंती केली आहे.

द काश्मीर फाईल्स उघडपणे आणि फुकट दाखवणे गुन्हा आहे. नेत्यांनी या सर्जनशील व्यवसायाचा आदर करावा. कायदेशीर आणि शांततेने तिकिट खरेदी करणे हा खरा राष्ट्रवाद असल्याचे विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या व्टिटमध्ये म्हटले आहे. विवेक अग्निहोत्री यांचे हे व्टिट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आठच दिवसांत चित्रपटाने ११९ कोटींची कमाई केली होती. आता देशभरातील ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रीनवर चित्रपट दाखविणे सुरू झाल्याने कमाईचा आकडा झपाट्याने वाढणार आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे बजेट फक्त १४ कोटी रुपये होते हे विशेष!