आमना शरीफला लोक म्हणायचे, तुझे लग्न झालेय अन् तुला मुलगाही; आता नाही मिळणार काम..!
आमनाने सांगितले, की डॅमेज ३ या वेबसिरीजमध्ये तिची एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे. मात्र ही पोलीस अधिकारी भ्रष्ट आहे. काही वर्षांपर्यंत महिलेला भ्रष्ट अधिकाऱ्यांची भूमिका मिळणे असा विचारही केला जात नव्हता. मात्र या वेबसिरीजच्या माध्यमातून ती संधी मिळाली आहे. रश्मी नावाच्या या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. मला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत करावी लागली, असे ती म्हणाली.
कही तो होगा ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील आमना शरीफच्या कशिश या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. लोकांनी त्यावेळी मुलींचे नावही कशिश ठेवणे सुरू केले होते. मात्र या प्रसिद्धीनंतर ती काही काळ अभिनयापासून दूर गेली होती. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली की, कही तो होगा नंतर मला एकाच प्रकारच्या भूमिकांबद्दल विचारण्यात येत होते. त्याच भूमिका मला रिपीट करायच्या नव्हत्या. मी योग्य भूमिका येण्याची वाट पाहत होते. दरम्यान त्यानंतर लग्नासाठी मी ब्रेक घेतला. मला त्या क्षणांचा आनंद घ्यायचा होता. मला आतापर्यंत घेतलेल्या कोणत्याही निर्णयांचा पश्चाताप नाही, असे ती म्हणाली. चित्रपटांमध्ये काम करत असताना मला कोणी मार्गदर्शक मिळाले नाही.
माझ्या परिवारातील कुणी चित्रपट क्षेत्राशी निगडित नव्हते. कशा पद्धतीच्या भूमिकांची निवड करावी याबद्दल सांगणारेही कोणी नव्हते. मला योग्य रस्ता दाखवणारे कोणी नव्हते असे ती म्हणाली. एक विलेन या चित्रपटानंतर मला अनेक सिनेमांचे प्रस्ताव मिळाले. मात्र तोपर्यंत मी आई झाले होते आणि म्हणून मी विचारपूर्वक ब्रेक घेतला. त्यानंतर अनेक लोक मला म्हणायचे की आता तुझे लग्न झाले आहे. तू एका मुलाची आईसुद्धा झाली आहे. आता तुला कधीही काम मिळणार नाही... लोकांच्या या बोलण्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला. मात्र हार मानायची नाही स्वतःला पुन्हा सिद्ध करायचे, असे मी ठरवले आणि त्यानंतर पुन्हा अभिनयाला सुरुवात केली, असे ती म्हणाली. मी एका मुस्लिम परिवारातील आहे. अभिनय क्षेत्रात येणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मात्र माझ्या आईने मला पूर्ण पाठिंबा दिला. माझ्यासाठी ती अनेकांसोबत भांडली. मला माझ्या कामाचा पहिला चेक मिळाला तेव्हा तो मी माझ्या आईला दिला ही बाब माझ्या आयुष्यातील गर्वाची गोष्ट आहे, असे ती म्हणाली.