४३ व्या वर्षी गायिका कनिका कपूर करतेय दुसरे लग्न!; २० मे रोजी लंडनमध्ये अडकणार बंधनात

 
मुंबई : बेबी डॉल फेम गायिका कनिका कपूर सध्या ४३ वर्षांची झाली असून, या वयात ती दुसऱ्या लग्नाची तयारी करीत आहे. २० मे रोजी  एनआरआय उद्योगपतीसोबत ती लग्न बंधनात अडकणार आहे. 

गौतम नावाच्या एनआरआय उद्योगपतीशी कनिका लग्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या एक ते दीड वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघे लंडनमध्ये लग्न करणार असल्याचे समजते. त्यासाठी कनिकाने तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. ती तिच्या मुलांसाठी कपडे खरेदी करीत आहे. वयाच्या १८ व्या वर्षी एनआरआय उद्योगपती राज चंडोकशी कनिकाचे पहिले लग्न झाले होते. दोघांना तीन अपत्ये आहेत. लखनौमध्ये लहानाची मोठी झालेली कनिका लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली होती.

१२ वर्षे सुखाचा संसार झाल्यानंतर पतीसोबत तिचा वाद सुरू झाला. नात्यात कटूता आल्याने २०१० मध्ये नवऱ्याचे घर सोडून कनिका पुन्हा लखनौला आली. २०१२ ला तिने घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर कनिकाने तिच्या संगीत करिअरकडे लक्ष केंद्रित केले.  त्यासाठी ती मुंबईला आली.  पहिल्यांदा तिला जुगनी जी... या गाण्याला आवाज देण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये सनी लियोनीच्या बेबी डॉल... या गाण्याला कनिकाने आवाज दिला. तिचे हे गाणे चांगलेच प्रसिद्ध झाले होते. या गाण्यासाठी तिला फिल्मफेयर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कनिकाने चिट्टीय्या कलईया आणि देसी लूक... सारख्या सुपरहिट ठरलेल्या गाण्यांना आवाज दिला आहे.