परिणीती चोप्रा रेस्क्यू मिशनवर जाणार!
परिणीती चोप्रा तिच्या नवीन सिनेमामुळे एकदम चर्चेत आली आहे. रिभू दासगुप्ता डायरेक्शन करत असलेल्या या आगामी सिनेमांमध्ये परिणीती चक्क एका गुप्तहेर एजंटच्या रोलमध्ये दिसणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असेल. अद्याप या सिनेमाचे कोणतेही शीर्षक निश्चित झालेले नाही. या अॅक्शन थ्रिलर सिनेमात परिणीती एका रेस्क्यू मिशनवर गेलेली दिसेल. पण हे रेस्क्यू मिशन कसे असेल ते समजू शकलेले नाही. हे मिशन भारत-पाकिस्तान संबंधांवर आधारलेले नसेल एवढे मात्र समजले आहे. या व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेमुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलेले असेल. रिभू दासगुप्ता यांच्याबरोबर परिणितीने द गर्ल ऑन द ट्रेनमध्येही काम केले होते. तिच्या आगामी सिनेमात रंजीत कपूर, केके मेनन, दिब्येंदु भट्टाचार्य आणि पंजाबी गायक अभिनेता हार्डी संधू हे देखील लीड रोलमध्ये असणार आहेत. सिनेमाचे शूटिंग पुढच्या वर्षी मार्चमध्ये सुरू होईल. सध्या या सिनेमासाठी लोकेशन शोधली जात आहेत. द गर्ल ऑन द ट्रेन हा परिणीतीचा सिनेमा 2016 मध्ये हॉलिवूडमध्ये याच नावाने आलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय संदीप और पिंकी फरारमध्येही ती दिसणार आहे.