क्रिषामी फार्मर प्रोड्यूसर कंपनीला उत्कृष्ठ कामगिरीबद्दल पुरस्कार; शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेतीचं वरदान ठरतेय ही कंपनी!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेतीचं वरदान ठरलेल्या क्रिषामी फार्मर प्रोड्यूसर कंपनीला उत्कृष्ठ कामगिरीबद्दल “मोस्ट इनोव्हेटिव्ह वर्किंग अवार्ड’ मिळाला आहे. महा एफपीसी, पुणेतर्फे हा पुरस्कार राज्यातील मोजक्याच फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना देण्यात आला. पुरस्काराचे वितरण अमरावतीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात राज्याचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
महा एफपीसी, पुणे यांनी पुरस्कारासाठी कंपन्यांची निवड करताना राज्यभरातील कंपन्याच्या कामकाजाची पाहणी केली. त्यातून क्रिषामीचीही निवड झाली. हरताळा या छोट्याशा गावातून (ता. भातकुली जि. अमरावती) ही कंपनी राज्यभर विशेषतः विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या प्रगती मेहनत घेत आहेत. त्यांना पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीकडे वळवून या पद्धतीच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नात भर घालत असल्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. मंत्री कडू आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर काळे व कमलेंद्र साखरे यांनी पुरस्कार स्वीकारला. संचालक श्री काळे यांनी हा पुरस्कार कंपनी आणि शेतकऱ्यांना समर्पित केला, अशी माहिती एक्स्पर्ट टीमचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी किशोर जामणेकर यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. या कंपनीबद्दल अधिक माहितीसाठी शेतकरी श्री. जामणेकर यांच्याशी 93706 66454 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.