‘शब्दवैभव’ नगरीचा ‘अक्षरतपस्वी’!
- संतोष थोरहाते, पत्रकार, विवेकानंद नगर, हिवरा आश्रम
शब्दांच्या दुनियेची जादू अन् रंगच न्यारा! हेच शब्द जेव्हा सुलेखनकारांच्या लेखनीतून प्रगट होतात तेव्हा त्या शब्दांना नवचैतन्य, सजीवता व अमरत्व प्रदान होते. सुलेखनकारांच्या सुलेखनांतून जणू शब्दांना वाणी प्राप्त होते. शब्द जणू आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आहे, याची प्रचिती व अनुभूती आली नाही तर मग नवलच म्हणा! आणि हे सर्व कसब, कौशल्य व हातोटी लीलया पेलण्याचे काम सुलेखनकाराची तरुण पिढी करीत आहे. तरुण सुलेखनकार अविरतपणे व निस्वार्थपणे काम करीत आहे. सुलेखनकारांच्या या मांदियाळीत अल्पावधीत आपल्या सजीव व चैतन्यपूर्ण सुलेखनाने एक अढळ स्थान प्राप्त केले ते विवेकानंद आश्रमाचे सहसचिव तथा सुलेखनकार म्हणून नावरूपास आलेल्या श्री. आत्मानंदभाऊ थोरहाते यांनी...
सोशल मिडीयाच्या काळात पत्रलेखनाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. मेल, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्रामच्या काळात मेसेजव्दारे थोडक्यात संदेश पाठविला जातो. यामुळे भावी पिढीचे शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर लिखाणाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या काळात सुध्दा कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजश्रींचे सान्निध्य व सहवासाने पावन झालेले विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते हे सुंदर हस्ताक्षर व शुध्द लेखनाची चळवळ सुरू ठेवली आहे. त्यांनी सुंदर हस्ताक्षराचा प्रचार व प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. महाराष्ट्र राज्यात तरूण सुलेखनकारांचा उदय होत असताना हा सिध्दहस्त सुलेखनकार आपल्या सुलेखनाच्या माध्यमातून सुलेखन तर करतो परंतु त्यासोबत सुविचारांच्या प्राजक्तांचा सडा सदैव पाडून वाचकांच्या मनावर अधिराज्य सदैव अधिराज्य गाजवित आहे. आपल्या सुलेखनातून सुलेखन चळवळीला गती व प्रतिष्ठे सोबत उभारी देण्याचे काम अविरतपणे करीत आहे. उदयोन्मुख सुलेखनकारांना सुलेखन करण्याची पध्दती, सुलेखन करतांना पेनाची पकड कशी ठेवावी, पेनाची निब कशी कट करावी, अक्षरांची ठेवण कशी ठेवली म्हणजे ते अधिक रेखीव होते.
या सर्वांचे सुखोल व शास्त्रशुध्द मार्गदर्शन सुध्दा करीत आहे. तरुणाईच्या स्मार्टफोनवर चिटकलेल्या बोटात पेन देवून त्यांना सुलेखनाची गोडी लावणारा हा सुलेखनकार काही अद्भूत आहे. तरुणाईला या सुलेखनाच्या दुनियेत रमणान करताना हा सुलेखनकार देह भान हरपून मग्न होवून जातो. आत्मानंदभाऊ थोरहाते यांनी अल्पावधीतच सुलेखन चळवळीला गती, वैभव दिले. त्यांनी सुलेखनातून केवळ सुलेखनच केले नाही तर संतांची अभंग रचना, ओव्या, दोहे, संस्कृत सुभाषित,काव्य यामधून तरुणाईसोबत साहित्यकांच्या मनाचा ठाव घेण्याचे काम केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सुध्दा आत्मानंदभाऊ थोरहाते यांनी सुलेखनाकडे तरूणाईला आणण्याचे काम केले. आपल्या सुरेख,गोलाकृती,रेखीव,आकर्षक व भरीव सुलेखनाने सुलेखन संस्कृतीचा ग्रामीण भागात परिचय करून दिला. आज या अक्षरतपस्वी श्री आत्मानंद भाऊ यांचा वाढदिवस.... जो दिल को अच्छा लगता है, उसी से दोस्ती करता हूँ। रिश्तों की सियासत मुनाफा, देखकर नहीं करता हूँ॥। या तत्वाप्रमाणे कायम मैत्री करणारा हळवा, संवेदनशील व मनमोकळे व्यक्तीमत्व म्हणजे आत्मानंद भाऊ... विवेकानंद आश्रमाच्या जनसंपर्क कार्यालयात काम करताना त्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन अमूल्य आहे. विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्य करताना त्यांनी वेळेचे कधीच बंधन पाळले नाही.. आदरणीय स्व.ह.भ.प.आबासाहेबांचे समाजसेवेचे सेवाव्रत अखंडपणे त्यांनी चालू ठेवले. प.पू.शुकदास महाराजश्रींच्या सेवाकार्यात काम करण्यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छांसह अभिष्टचिंतन!