स्मार्टकाळजी!

आपल्या घरातील सर्वच उपकरणांची आपण नियमितपणे काळजी घेत असतो. टीव्ही, फ्रीज किंवा एसी सारख्या उपकरणांचे तर वर्षातून एकदा- दोनदा तंत्रज्ञांमार्फत सर्व्हिसही करून घेतली जाते. पण घरात अथवा बाहेर सतत आपल्या सर्वात जवळ असलेला स्मार्टफोन मात्र दुर्लक्षितच राहतो. स्मार्टफोनची अंतर्गत काळजी म्हणजे अनावश्यक अॅप हटवणे, फाइल्स हटवून मेमरी मोकळी करणे या गोष्टी आपण येता- जाता करत …
 

आपल्या घरातील सर्वच उपकरणांची आपण नियमितपणे काळजी घेत असतो. टीव्ही, फ्रीज किंवा एसी सारख्या उपकरणांचे तर वर्षातून एकदा- दोनदा तंत्रज्ञांमार्फत सर्व्हिसही करून घेतली जाते. पण घरात अथवा बाहेर सतत आपल्या सर्वात जवळ असलेला स्मार्टफोन मात्र दुर्लक्षितच राहतो. स्मार्टफोनची अंतर्गत काळजी म्हणजे अनावश्यक अ‍ॅप हटवणे, फाइल्स हटवून मेमरी मोकळी करणे या गोष्टी आपण येता- जाता करत असतो. पण मोबाइलची बाह्य काळजी घेण्याचे फारसे कुणी मनावर घेत नाही. फार फार तर मोबाइल शर्टला घासून पुसणे, इतका सोपस्कार आपण पार पाडतो. पण स्मार्टफोनची बाहेरून देखभाल नीट केली तर तो जास्त काळ टिकू शकतो, हे लक्षात ठेवा.

त्यासाठीच या टिप्स…

– कधीही नवीन फोन घेतेवेळेसच त्याचे कव्हर (केस) आणि स्क्रीन प्रोटेक्टर खरेदी करा. यामुळे तुमचा मोबाइल ओरखडे किंवा छोट्या- मोठ्या धक्क्यांपासून सुरक्षित राहू शकतो. कव्हर असल्यास मोबाइलचे थेट धुळीपासून रक्षण होते. – आपल्याला मोबाइल सतत जवळ हवा असतो. अगदी झोपतानाही तो उशाशी ठेवला जातो. मात्र, हे फोनसाठी धोक्याचे आहे. अनवधानाने तो खाली पडल्यास वा त्यावर भार पडल्यास फोनचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून वापर नसताना फोन शक्यतो सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्यासाठी घरातील एखादी जागा निश्‍चित करायला हरकत नाही. ही जागा लहान मुलांच्या हाताला लागणार नाही, अशी असावी. – स्मार्टफोन नेहमी कोरडा राहील, याची दक्षता घ्या. ओल्या हाताने फोनला स्पर्श करू नका. जेवताना मोबाइल हाताळणे टाळा. अन्यथा फोनची स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते. – फोन नेहमी स्वच्छ पुसत जा. यासाठी कोरडे टिश्यू पेपर किंवा अल्कोहल वाइप्स यांचा वापर करा. पाणी किंवा बेबी वाइप्सच्या साह्याने फोन पुसू नका.