दुसरबीड : ‘राष्ट्रवादी’च्या शिबिरात 137 जणांनी केले रक्तदान
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत असून राज्यात सध्या आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने सर्व रक्तपेढी, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेते सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. त्यानुसार 18 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दुसरबीड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. दुसरबीड व परिसरातील 137 जणंनी रक्तदान केले.
शिबिरात सकाळी नऊला दत्ताजी भाले रक्तसंकलन पेढी औरंगाबाद यांच्या सहकार्याने रक्तदानास सुरुवात झाली. सकाळपासूनच दुसरबीड, जऊळका, पिंपळगाव कुडा, लिंगा, देवानगर, बिबी, तळेगाव, राहेरी, शिवनी, जांभोरा, रूमणा यासह इतर गावांतील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. शिबिरास दुसरबीड परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व पत्रकार मंडळींनी भेटी देऊन रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.