समृध्दीवरील अपघात रोखण्यास यंत्रणेला यश! एएसपी बी.बी महामुनिंचा दावा!
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर होत असणाऱ्या विविध अपघायांना रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विविध यंत्रणेने एकत्र येऊन अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मागील २५ दिवसात अपघात रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
पत्रकार परिषदेत संबोधित करतांना महामुनी म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यातून ८७ किलोमीटर समृद्धी महामार्ग जात असून या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व ते प्रयत्न केल्या जात आहेत. विविध उपाययोजना जिल्हाधिकारी तूम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी समृद्ध महामार्गाचे अधिकारी हे संयुक्तपणे करत आहेत. यामुळे या महामार्गावरील अपघात रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे महामुनी यांनी सांगितले. गेल्या २५ दिवसात एकही मोठा अपघात झाला नाही. प्रशासन या संपूर्ण बाबीची अत्यंत काटेकोरपणे काळजी घेत आहेत. त्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन देखील अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी यांनी केले आहेत. सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला दे. राजा उपविभागीय अधिकारी अजयकुमार मालवीय व ठाणेदार केशव वाघ हे उपस्थित होते.
अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा बोर्ड लावणे, रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करणे, टॉर्च रिफ्लेक्टर, बॅरिकेटिंग, लाईफ जॅकेट यासह विविध उपायोजना करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच जिल्हा हद्दीत दोन गाड्यांसह २० कर्मचारी नियुक्त करून पेट्रोलिंग वाढवणे जिल्हा हद्दीत वायरलेस यंत्र कार्यान्वित करणे सुरू आहेत असेही महामुनी यांनी सांगितले. समृध्दी महामार्गाचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर आरटीओ व पोलीस प्रशासनाअंतर्गत कारवाई सुरू आहे.आजपर्यंत ५५४ वाहनावर कारवाई करून जवळपास साडेपाच लाखाचा दंड वसूल करण्यात आल्याचेही महामुनी यांनी सांगितले.