महिला, मुलींसाठी ९० टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजना! २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येते. यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

psc

योजनांच्या लाभामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावतो. तसेच त्यांना वैयक्तिक कमाईचे साधन मिळते. मागील ५ वर्षांत लाभ घेतला नसल्यास लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत. एका योजनेसाठी एका लाभार्थ्यास एकच अर्ज सादर करता येणार आहे.

या लाभासाठी चार योजना आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना पिठाची चक्की घेण्यासाठी ९० टक्के अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व मुलींना शिलाई मशिन घेण्यासाठी ९० टक्के अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मिनी दाल मिल घेण्यासाठी ९० टक्के अनुदान, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना मसाला उद्योग मशीन घेण्यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजनांचे अर्ज आणि संबंधित अटी व शर्ती तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण, तसेच बेबसाईटवर उपलब्ध आहे.

तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद बंडोले यांनी केले आहे..