आनंदाची बातमी! जून ते सप्टेंबरमध्ये यंदा सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस! भारतीय हवामान खात्याचा अंदाज; बुलडाणा जिल्ह्यात कधी होणार मान्सूनचे आगमन? बातमीत वाचा तारीख...
Jun 1, 2024, 09:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय हवामान खात्याने दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाची शक्यता १०६ टक्के म्हणजे सर्वसाधारणपेक्षा जास्त अशी वर्तविण्यात आली आहे. ज्यामध्ये देशाची जून ते सप्टेंबर महिन्यातील पावसाची दीर्घकालीन सरासरी (१९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाची सरासरी) ही ८७ सेंमी म्हणजेच ८७० मिमी आहे. विभागनिहाय पावसाचा दीर्घावधी अंदाज पाहता मध्य भारतामध्ये ज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात १०६ टक्के म्हणजेच सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या जागतिक मॉडेलच्या अंदाजानुसार येत्या मान्सून हंगामात भारतीय समुद्रातील पाण्याचे तापमान येणाऱ्या मान्सूनसाठी सकारात्मक आहे.
२०२१ पासून भारतीय हवामान खात्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशा चार महिन्यांचा स्वतंत्र दीर्घावधी पावसाचा अंदाज प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. या चार महिन्यांसाठी मासिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग जागतिक स्तरावरील अनेक मॉडेल्स एकत्र करून व प्रामुख्याने मान्सून मिशन संयुग्मित अंदाज प्रणालीचे मॉडेल वापरून अंदाज वर्तविते. या अंदाजान्वये जून महिन्यात मध्य भारतातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन १३ ते १५ जूननंतर होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेसा पाऊस म्हणजेच ७५-१०० मिमी पाऊस सलग दोन, तीन दिवसात पडल्यानंतर व जमिनीतील ओलावा १ फूट खोल लक्षात घेऊन पेरणीचा निर्णय घ्यावा व पेरणी वाफसा परिस्थितीत करावी. पावसाबाबत अद्ययावत अंदाज प्राप्त होण्यासाठी व खरीप पिकांसाठी शेतीतील दैनंदिन कामांचे सुयोग्य व सुक्ष्म व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे आठवड्यातून मंगळवारी व शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या हवामान आधारीत कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा, तसेच खराब हवामान परिस्थितीत विजांपासून संरक्षण, सुरक्षा तथा जीवितहानी टाळण्यासाठी दामिनी मोबाइल ॲपचा वापर करावा, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले आहे.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांचे नियोजन करावे व त्यानुसार वाणांची निवड करावी. निवड केलेल्या वाणांची बाजारपेठेत उपलब्धता असल्याची पेरणीपूर्वी करावी. जून महिन्यात पेरणी करताना मातीतील ओलावा, पाऊसमान व कमाल तापमान आवर्जून लक्षात घ्यावे असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांनी केले आहे.