'देवा कसा फास ह्यो तुझा..'! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा उरात धडकी भरवणारा!
चार महिन्यात राज्यात ८३८ तर जिल्ह्यात तब्बल "एवढ्या" शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; सरकारची धोरणे कारणीभूत...
Jun 28, 2024, 08:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका दाण्याचे हजार दाणे करणारा आणि उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी संकटात आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी...त्याला जेव्हा जे पाहिजे असत नेहमी त्याच्या विपरीतच होत..पाऊस हवा असतो तेव्हा दुष्काळ पडतो अन् जेव्हा पावसाची गरज नसते तेव्हा अतिवृष्टी आणि गारपीट होते.. बिचाऱ्यान करावं तरी काय? घराचा संसार, लेकराबाळांच शिक्षण, मुलींचं लग्न कसं करायचं त्यानं? या सगळ्या संकटाला धीरोदात्तपणे तोंड देऊन तो काढतोही उत्पादन..पण बाजारात गेल्यावर त्याला कळत आपल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार आपल्याला कुठय? व्यापाऱ्यांना श्रीमंत आणि शेतकऱ्यांना गरीब बनवणाऱ्या धोरणांना तो बळी पडतो..४ महिने मोठ्या आशेपायी जीवापाड जपलेल्या पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही..पिकाच्या आशेवर सावकाराकडून, फायनान्स कडून घेतलेले कर्जही फेडता नाही..कर्जाचा बोजा वाढत जातो तसा त्याच्या गळ्याभोवती फास आवळत जातो..मायबाप सरकार अधूनमधून शासकीय मदतीचे गाजर दाखवते पण तुटपुंज्या मदतीत काय होणार? शेवटी तो वैतागतो अन् लेकरांचे चेहरे, बायकोचा चेहरा डोळ्यात साठवत नको तो निर्णय घेतो... वर्तमानपत्रात शेतकरी आत्महत्येची बातमी छापून येते, आपली संवेदनशीलता दिसावी म्हणून उभ्या आयुष्यात त्याची ख्यालीखुशाली न विचारलेले पुढारी "त्याच्या" घरी सांत्वन भेटीला जातात, फोटो काढून त्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे ढोंग करतात..सरकारही नंतर मदतीचा धनादेश देते..मात्र धनादेशातेही त्याच्या बायकोला नवरा दिसतो अन् लेकरांना बाप..सरकारकडून मदतीची अपेक्षा त्याला नव्हतीच.. त्याला हवे होते फक्त त्याच्या कष्टाला दाम..कारण तो लाचार नाहीये... तो स्वाभीमानी आहे..पण.. मुर्दाड सरकारने त्याचा बळी घेतलाच...! राज्यात गेल्या ४ महिन्यात सरकारी धोरणांनी तब्बल ८३८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपले आहे. बुलडाणा जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे.
शेतकऱ्यांना सुरूवातीपासूनच अस्मानी संकटाशी दोन हात करावे लागतात. शिवाय विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्या जातो. कर्ज काढून व तुटपुंजी जमापुंजी करत शेतकरी शेतातील कामे करतात. झालेल्या उत्पन्नाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. अश्या अनेक प्रकारच्या संकट शेतकऱ्यांवर कोसळतात. यातून नैराश्य येते आणि जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय शेतकरी घेतात. मागील चार महिन्यात राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी हा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली. तर जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांनी देखील मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे..अर्थात हा आकडा उरात धडकी भरणारा आहे खरा पण गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक दिसत नाही..