संतनगरी ते रामनगरी! खामगाव तालुक्यातील ३६० रामभक्त होणार आज अयोध्येसाठी रवाना! रात्री निघणार अकोला- अयोध्याधाम स्पेशल ट्रेन!

 
खामगांव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आयोध्या नगरीत श्रीराम मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संपूर्ण देशवासी रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होतायेत. त्याच अनुषंगाने विदर्भातील रामभक्तांना देखील प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून आज १४ फेब्रुवारी रोजी अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन निघणार आहे. ००१५७ या क्रमांकाची स्पेशल अकोला - अयोध्या धाम गाडी धावणार आहे. अकोला येथून रात्री ११:५५ वाजता ही ट्रेन सुटणार आहे.पुढे रात्री १:३० वाजता संत नगरी शेगावात ही ट्रेन दाखल होईल. या ट्रेनने खामगाव तालुक्यातील ३६० रामभक्त अयोध्येसाठी रवाना होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने अयोध्या धाम स्पेशल ट्रेन सुरू केली. विशेष म्हणजे विदर्भातील भाविकांसाठी अकोला- अयोध्याधाम ही ट्रेन महत्वाची ठरत आहे. अकोला येथून रात्री१:३० संत नगरी शेगावात ही ट्रेन पोहचून पुढे भुसावळ, खांडवा, इटासरी ,भोपाळ, बिना, झांसी,औराई, कानपूर मार्गे १२६६ किमी अंतर पार करत अयोध्येला पोहोचणार आहे. या स्पेशल रेल्वे गाडीमध्ये एकूण वीस डबे आहेत. प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने विविध ठिकाणावरून पूर्णपणे गाडी बुक करून टाकली आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी आपल्या मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व राम भक्तांसाठी एकूण पाच रेल्वे डबे आरक्षित केले. आज रात्री ते अयोध्येसाठी रवाना होणार आहे.