जिल्ह्यात साक्षरता वाढावी असे तुम्हालाही वाटते ना? मग या कार्यात तुम्हीही योगदान देऊ शकता! कसे ते जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी सांगितलं..

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्यात असलेल्या निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी जिल्ह्यातील स्‍वयंसेवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

केंद्र शासनाने २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी नवसाक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. जिल्हा साक्षर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील निरक्षर लोकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. राज्यस्तरावरून वर्षनिहाय निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या योजनेत कोणतेही मानधन देण्यात येणार नसल्याने राष्ट्रीय कार्यात स्वयंसेवक, सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, जिल्हा साक्षर होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.