करो योग, रहो निरोग!आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा; रक्तदानही करा! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन; बुलडाणा जिल्ह्यात कसे आहे कार्यक्रमाचे नियोजन..वाचा.

 
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या, शुक्रवार, दि. २१ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ .पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जगभरात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस दि. २१ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने ‘योग स्वयम आणि समाजासाठी’ ही टॅगलाईन निश्चित केली आहे. जिल्ह्यात योग दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुकास्तरावर तालुका क्रीडा संकुलात नियोजन करण्यात आले आहे. यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यार्थी, पोलिस, योग संस्था आणि सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. बुलडाणा येथील कार्यक्रम जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात सकाळी ६:३० वाजता घेण्यात येणार आहे.
योग दिनाच्या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठीही युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.