१९ दिवसांनी ठरणार बुलडाण्याचा खासदार! जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले मतमोजणीचे प्रशिक्षण! मतमोजणी केंद्रात मोबाईल नेता येणार नाही! जिल्हाधिकारी म्हणाले, जबाबदारीने कार्य पार पाडा...
May 16, 2024, 10:21 IST
बुलडाणा(जिमाका): लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा हा मतमोजणी हा आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी ही संवेदनशील बाब आहे. त्यामुळे मतमोजणीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात काल,१५ मे रोजी अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवडणुकीच्या मतमोजणीबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, डॉ. रामेश्वर पुरी, शैलेश काळे, संजय खडसे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, मतदार नोंदणी, त्याची पडताळणी, मतदान आणि मतमोजणी हे चार टप्पे निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानापर्यंतची प्रक्रिया पार पडली आहे. आता मतमोजणी हा अतिशय संवेदनशील टप्पा पार पाडावयाचा आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व्हीस वोटर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे पोस्टल मतदान आणि इव्हीएमवरील मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे जबाबदारीने वेळेत पार पाडावी. मतमोजणीच्या दिवशी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नसल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतच्या निर्देशाचे पालन करावे. मतमोजणीचे कार्य अत्यंत संवेदनशील असल्याने कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ सजगतेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले. यावेळी डॉ. पुरी आणि श्री. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण दिले.