गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा! जिल्ह्यात डोळ्यांचा संसर्ग पसरतोय; दिवसाला ५०० जणांना होतेय बाधा; संसर्ग टाळण्यासाठी "अशी" घ्या काळजी.. ​​​​​​​

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. आजघडीला दिवसाला जवळपास ५०० जणांना डोळे येणे या आजाराची बाधा होत आहे..आरोग्य विभाग यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करीत असला तरी हा संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.  घरातील लहान मुलांना या आजाराचा प्रचंड त्रास होते, लहान शिशुंना हा आजार झाल्यास बाळ खूप रडते.
 

पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढलेला असतो. अशा वातावरणात संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढतात.सर्दी, खोकला, ताप याबरोबरच डोळे येणे या आजाराची साथ दिवसांत पसरते. वैद्यकीय भाषेत या आजाराला "कंजेक्टीव्हायटीस" असे म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीशी दीर्घकाळ संपर्क तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीचा रुमाल, कपडे वापरल्यास  निरोगी व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते.

 पुरग्रस्त जळगाव जामोद, संग्रामपूरात अधिक रुग्ण...
 
 जिल्ह्यात जळगाव जामोद आणि संग्रामपूरात अतिवृष्टीने थैमान घातले. आता याच भागात साथीचे आजार वाढले आहेत. डोळे येणे या आजाराचे रुग्ण या तालुक्यांत अधिक प्रमाणात आहेत ..

हस्तांदोलन टाळा, एसीचा वापर टाळा..!

 डोळे आलेल्या व्यक्तीने स्वतःहून आपल्यापासून संसर्ग वाढू नये याची काळजी घ्यावी.त्यासाठी रुमाल, टॉवेल, आंघोळीचे साबण स्वतंत्र असावे. डोळे आलेल्या व्यक्तीने संसर्ग पसरू नये म्हणून व निरोगी व्यक्तीने आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून चष्मा वापरावा. बाहेर कोणत्याही वस्तूला हाताने स्पर्श करू नये, नंतर हात वारंवार डोळ्याजवळ नेऊ नये. शक्यतोवर सॅनिटायझर वापरावे, ते नसेल तर हात साबणाने स्वच्छ धुवावे. पुढील काही दिवस हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार केलेला बरा. वातानुकीलत वातावरणात असा संसर्ग झपाट्याने पसरतो त्यामुळे एसीचा वापर टाळावा. नियमांचे काटेकोर पालन केल्यास संसर्ग रोखता येऊ शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीने घरघुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..