लाडक्या बहिणीचे पैसे भावाकडून वसूल! १०० चा स्टॅम्प बंद; आता पाचशे रुपयांचा घ्यावा लागणार...
Oct 17, 2024, 10:29 IST
लोणार(सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात नद्या मंजूर, डोंगर मंजूर असा कारभार सुरू आहे. एक नव्हे हजारो योजना आल्या आहेत. परंतु एका हाताने हजार द्यायचे अन् दुसऱ्या हाताने दहा हजार काढून घ्यायचे असा काही प्रकार सुरू आहे... लाडक्या बहिणींना दीड हजार दिले परंतु त्याच बहीनीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जात आहे. आतापर्यंत नोटरीचा साधा बॉन्ड १०० रुपयांना मिळत होता. आता तो ५०० रुपयांना मिळणार
आहे. बहिणीला दिलेले भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.
विधानसभेची निवडणूक तोंडावर येताच राज्य सरकार विविध योजना राबविल्या.राबवलेल्या योजनांचे स्वागतच आहे. मात्र हा प्रकार निव्वळ मतदारांना आकर्षित करण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे. बरे या योजनांमधून सर्वाचे भले होत असेल तर लोकांना समाधान वाटले असते. मात्र सरकारने विकास कामाला खुट्टी मारत लाडक्या बहिणी व इतर योजनांसाठी दिलेल्या पैशांची वसुली सुरू केली आहे. एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने वसूल करण्यात धंदा राज्य सरकार करत आहे. लाडक्या बहिणीची योजना सुरू करून महिलांना खुश करण्यात आले परंतू शेतीमालाल भाव नाही, बेरोजगारी वाढली आहे. नोकरी मिळालीच तर ती कंत्राटी असते. दर्जेदार शिक्षण दुर्मीळ झाले आहे. आशा अनेक गोष्टीसाठी नागरिक झगडत आहेत. पण राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करून मतदारांना तात्पुरते खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना खूश केले पण लाडक्या भावाचा खिसा कापला जात आहे. यापूर्वी नोटरी अथवा विविध कामासाठी १०० रुपयांचा बॉड मिळत होता. तो आता बंद करण्यात आला असून लहान - मोठे काम असले तरी ५०० रुपयांचा बाँड भावांना घ्यावा लागणार आहे. यातून सरकार बहिणीला दिलेले भावाकडून कैकपटीने वसूल करत आहे. याचा फटका सध्याच्या सत्ताधाऱ्यांना बसणार आहे.
बॉन्डच्या किमती ५०० टक्क्यांनी वाढल्याने नाराजी...
विविध कामांसाठी सर्वसामान्य लोक रोज लाखो बाँडची खरेदी करतात. यापूर्वी नोटरी अथवा इतर लहान मोठ्या कामासाठी अवघ्या १०० रुपयांचा बाँड मिळत होता. लाडकी बहीण व इतर अनेक योजना राबवल्यानंतर या बाँडची किंमत ५०० टक्के वाढ करून ५०० एवढी करण्यात आली आहे. हा प्रकार लाडक्या बहिणींना दिलेले भावाकडून वसूल करण्याचा असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. समाज माध्यमात याची जोरदार चर्चा असून लाडक्या बहिणीतून कमावले अन् भाऊ नाराज करून गमावले, अशी गत विद्यमान सरकारची होणार आहे.