कडक निर्बंध झुगारले… दुसरबीडमध्ये सहा दुकानदारांवर कारवाई; 12 हजारांचा दंड वसूल
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 10 मेपासून जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या काळात दुसरबीड येथे ग्रामपंचायतीने दोन किराणा व्यापाऱ्यांकडून दोन दिवसांत पाच-पाच हजार आणि इतर चार दुकानदारांकडून प्रत्येक पाचशे असा दोन हजार रुपये दंड वसूल केला. नियम मोडून दुकाने सुरू ठेवल्याने ही एकूण 12 हजार रुपयांची कारवाई करण्यात आली. कारवाईत सरपंच पती प्रकाशराव सांगळे, तलाठी राहुल देशमुख, ग्रामसेवक संजय चौधरी, पोलीस पाटील पती गजानन मखमले आणि पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
रस्त्यावरील वर्दळीचे काय?
कडक निर्बंध फक्त छोट्यामोठ्या व्यापार्यांकरताच लागू आहेत का? असा सवाल रस्त्यावर भाजीपाला विकणारे व फळेविक्रेत्यांनी केला. निर्बंधांसंदर्भात अंमलबजावणी करणारी यंत्रणा सकाळी व संध्याकाळीच दिसते. उरलेल्या काळात रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते, असा आरोपही या व्यावसायिकांनी केला.