“हाल’ न तपासताच “स्वबळ’ जोरावर!; रेखाताईंनी निर्णय घेण्याआधी पदाधिकाऱ्यांनाही चर्चेपासून ठेवले “वंचित’!!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर सध्या “मेडिकल लिव्ह’वर असल्याने त्यांचा प्रभार रेखा ठाकूर यांच्याकडे आहे. आता तात्पुरता चार्ज सांभाळणाऱ्या व्यक्ती मोठे निर्णय घेत नाहीत किंवा जाहीर करत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. मात्र या संकेताला अपवाद ठरत रेखा ठाकूर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित करून टाकले आहे. मात्र निर्णय जाहीर करण्यापूर्वी मागील लढतीत स्वबळावर झालेले पक्षाचे बेहाल, अनेक तालुक्यांत खाली राहिलेली कपबशी, सध्याची राजकीय स्थिती, दिग्गज नेत्यांचे पक्षातून झालेले एक्झिट यावर साधक बाधक विचारमंथन, अभ्यासच रेखाताईंनी केला नसल्याचे दिसून येत असून, याबद्दल अभ्यासू कार्यकर्ते, रस्त्यावर लढणारे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतून चिंता व्यक्त होताना दिसत आहे. स्वबळाची भाषा कशाच्या बळावर, हा प्रश्न विचारला जात आहे.
मुळात स्वबळाचा निर्णय रेखाताईंनी सामाजिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून घोषित केला. जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी सामूहिक चर्चा केली होती का, हा प्रश्नच आहे. स्वबळाच्या लढतीच्या निर्णयावर अभ्यासू कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करण्याची कारणे अनेक आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांत पक्षाची जेमतेम कामगिरी या सवालाचे मूळ आहे. एकूण ३०१ जागा असणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकांत “वंचित’च्या उण्यापुऱ्या १३ जागा, ६० सदस्यीय जिल्हा परिषदेत ३ आणि पंचायत समित्यांच्या १२० जागांपैकी पक्षाच्या झोळीत केवळ ८ जागांचे दान मिळालेले! अनेक तालुक्यांत तर जनतेने विजयापासून अन एंट्रीपासून “वंचित’ केलेले! त्यावेळी पक्षात बळीराम शिरस्कार, प्रसेनजीत पाटील, मोहम्मद सज्जाद सारखे नेते होते. निळे वादळ एकगठ्ठा होऊन मागे उभी राहिलेले होते. एमआयएमशी जवळीकही होती. विजयी झालेले बहुतेक उमेदवार स्वयंभू व प्रबळ होते. शेगाव तालुका याचे उदाहरण.
४ प्रमुख पक्ष स्वबळावर असल्याने काही ठिकाणी मतांची विभागणी “वंचित’ला पूरक ठरली. बुलडाणा नगरपालिका अध्यक्ष नजमुन्नीसाबेगम मो. सज्जाद यांनी बुलडाण्याच्या लढतीत मिळविलेला विजय याचे उदाहरण म्हणून समोर आहे. (कालकथित विजय गवई, पैगंबरवासी मुमताज मास्टर, विष्णू उबाळे, शंकर मलबार यांचा सहभागही या विजयासाठी महत्त्वाचा ठरला होता.) मात्र कालांतराने पक्षाखातीर बाळापूर येथून येऊन बुलडाणा लोकसभा लढविणारे शिरस्कार यांचा राजकीय बळी देण्यात आला. त्यापायी एक मोठा समाज दुखावला. प्रसेनजीत पाटील, जितेंद्र जैनसारखे नेते सोडून गेले. एमआयएमशी नंतर फारकतही झाली. मो. सज्जाद मागील विधानसभेत त्यांच्याकडून लढले. सर्वात धोक्याची घंटा म्हणजे चळवळ आघाडीपासून दूर जात असल्याची व काँग्रेसकडे झुकत असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभारी प्रदेशाध्यक्षांनी केलेली स्वबळाची घोषणा अनेक सवाल उपस्थित करणारी आहेत. याची उत्तरे प्रथम तीन- चार महिन्यांवर आलेल्या नगरपालिका लढतीत आणि नंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मिळतीलच, अर्थात ती उत्तरे देखील नेत्यांना रुचणारी नसणार असा जाणकारांचा अंदाज आहे.
समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज
समविचारी पक्षांना एकत्र आणून आता “वंचित’ने पुढील वाटचाल करावी, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त होत आहे. यासाठी यापूर्वीच काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे. मात्र काँग्रेसची विचारसरणी काही बहुजनवादी पक्षांना पटत नाही. त्यामुळे “वंचित’ हा चांगला पर्याय ठरू शकतो.
इशारा ः बुलडाणा लाइव्हवरील बातम्या, फोटो कॉपी करण्यास मनाई असून, असे करताना कुणी आढळल्यास सा. भालाफेक आणि लाइव्ह ग्रुपकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.- संचालक