येळगावकरांची रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर धडक! पैनगंगेच्या खोलीकरणाची मागणी; पर्यटन केंद्राला सक्त विरोध!! अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी पैनगंगा नदीपत्रात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीपिकांचे व शेत जमिनीचे मोठे नुकसान होते. त्यासाठी पैनगंगा नदीपत्रातील रस्ता खोलीकरण करावे व आम्हाला पुराच्या धोक्यापासून वाचवावे. हवं तर आमची नुकसान भरपाईची रक्कम तुमच्याकडे ठेवा पण नदी खोलीकरण करा, असे …
 
येळगावकरांची रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कचेरीवर धडक! पैनगंगेच्या खोलीकरणाची मागणी; पर्यटन केंद्राला सक्त विरोध!! अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी पैनगंगा नदीपत्रात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीपिकांचे व शेत जमिनीचे मोठे नुकसान होते. त्यासाठी पैनगंगा नदीपत्रातील रस्ता खोलीकरण करावे व आम्हाला पुराच्या धोक्यापासून वाचवावे. हवं तर आमची नुकसान भरपाईची रक्कम तुमच्याकडे ठेवा पण नदी खोलीकरण करा, असे कळकळीचे साकडे येळगाव परिसरातील आपाद्‌ग्रस्‍त शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. याशिवाय तसेच धरणाला सांडवा काढा व मानव संचालित पाच दरवाजांची मागणीही जिल्हा कचेरीत वादळासारख्या आलेल्या जंबो शिष्टमंडळाने केली. यावर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या सर्व प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्याचे ठोस आश्वासन दिले.

अल्प कालावधीतच पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील आणि धरण परिसरातील शेती व पिकांचे मोजमाप न करण्याइतके नुकसान झाले. शेकडो एकर जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले. तोंडपुंजली आश्वासने अन्‌ दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणारी भरपाईची भीक यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यावर रविकांत तुपकरांनी त्यांच्यासह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. एस. रामामुर्ती यांच्याशी चर्चा करताना “सायबां’सोबत शेतकऱ्यांचा संवाद देखील घडवून आणला!

पर्यटन केंद्र हवे की शेतकऱ्यांचा जीव?
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करतानाच प्रस्तावित पर्यटन केंद्राला कडाडून विरोध दर्शविला. धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. ज्या जमिनीचा वापर धरणासाठी झाला नाही त्या जमिनी आम्ही ४०- ५० वर्षांपासून वहीती करतो. ज्‍या उद्देशाने त्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्या उद्देशासाठी त्या जमिनीचा उपयोग झाला नसेल तर त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, असा कायदा आहे. पण त्या जमिनीवर पर्यटन स्थळ उभे करण्याचा घाट बुलडाणा नगर पालिकेने घातला आहे. आमच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तेवढीच जमीन आहे. जर ती जमीन गेली तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल. पर्यटन स्थळ झाले नाही म्हणून कोणी आत्महत्या करणार नाही पण जमिनी गेल्या तर आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.