मुकुल वासनिकांच्या नव्या राजकीय इनिंगचा काही तासांत फैसला! “त्या’ निकषामुळे वाढली शक्यता!!

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते, गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय अन् यासोबतच बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे तारणहार अशी ओळख असलेल्या मुकुल वासनिकांच्या संभाव्य नवीन राजकीय इनिंग आणि राजकीय भवितव्याचा फैसला येत्या काही तासांत होणार आहे! याचबरोबर राज्यातील अनेक दिग्गजदेखील शर्यतीत असल्याने जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेस जणांचे लक्ष उमेदवारीचा अर्थात राज्यसभा खासदारकीचा जॅकपॉट …
 
मुकुल वासनिकांच्या नव्या राजकीय इनिंगचा काही तासांत फैसला! “त्या’ निकषामुळे वाढली शक्यता!!

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते, गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय अन्‌ यासोबतच बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे तारणहार अशी ओळख असलेल्या मुकुल वासनिकांच्या संभाव्य नवीन राजकीय इनिंग आणि राजकीय भवितव्याचा फैसला येत्या काही तासांत होणार आहे! याचबरोबर राज्यातील अनेक दिग्गजदेखील शर्यतीत असल्याने जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेस जणांचे लक्ष उमेदवारीचा अर्थात राज्यसभा खासदारकीचा जॅकपॉट कुणाला लागतो याकडे लागले आहे.

अल्पावधीतच काँग्रेसमधील दिग्गज नेते ठरलेले राजीव सातव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्रातून ही निवड होणार आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे बहुमत लक्षात घेतले तर उमेदवारी म्हणजे हमखास विजय अर्थात खासदारकीची ग्यारंटी! अर्थात ही उमेदवारी मिळणे इतके सहज नाही. याचे कारण उमेदवारीसाठी गुलाब नबी आझाद, मिलिंद देवरा, डॉ. प्रज्ञा सातव, पृथ्वीराज चव्हाण, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ आदी नेते इच्छुक आहेत. अलीकडे यात सुशीलकुमार शिंदे, संजय निरुपम, रजनी पाटील यांसारख्या नेत्यांच्या नावांचीही भर पडली. यामुळे स्पर्धेचा हा चक्रव्यूह पार करून उमेदवारीचा अचूक वेध घेण्यात वासनिक यशस्वी होतात काय? हे पाहणे रंजक ठरले आहे.

महाराष्ट्राचाच नेता असणार उमेदवार?
दरम्यान या घडामोडीमुळे राजधानीतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी उमेदवारीवरून सोनिया गांधी यांच्यासमवेत चर्चा केल्याचे वृत्त आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मध्यंतरी दिल्लीतच तळ ठोकून होते. राज्याबाहेरचा नेता लादण्यात येणार नाही वा हायकमांडच्या जवळचा असला तरी संघटनेच्या कामी न पडू शकणाऱ्या कमकुवत नेत्याला संधी मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आल्याने वासनिकांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्या मनसुब्यात आझाद ही मोठी अडचण होती. ती या निकषामुळे दूर झाली आहे. त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात असलेला खुशनुमा माहौलवरूनही हा अंदाज बांधता येतो. आज, २० सप्‍टेंबरला रात्री उशिरा उमेदवारीचा फैसला होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे साडेसात वर्षांनंतर संसदेत जाण्याची आणि दमदार सेकंड इंनिंगची संधी वासनिकाना मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही तासांनी मिळणार आहे. आता ज्येष्ठ नेते या संज्ञेस पात्र वासनिकाना ही संधी मिळाली तर ती त्यांच्यासाठी राजकीय मुख्यधारेत जाण्याची आणि सभागृहात दमदार कामगिरी करीत सर्वांना प्रभावित करण्याची सुवर्णसंधी असणार हे उघड आहे. मात्र दुर्दैवाने ही संधी हुकली तर सभागृहामध्ये पुन:प्रवेशाचे त्यांचे मनसुबे लवकर पूर्ण होणे खडतर ठरणार आहेत.