ब्रेकिंग! सरपंच निवडीनंतर लगेच रंगणार 70 ग्रामपंचायतींमध्ये लढती!! 103 जागांसाठी होणार घमासान
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, सरपंच निवडणुका झाल्या म्हणजे संपलं, ग्रामीण राजकारण शांत झाले असा जर कुणाचा (गैर) समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. याचे कारण चालू महिन्यातच पुन्हा 70 ग्रामपंचायतींमध्ये 103 जागांसाठी घमासान रंगणार आहे. त्यामुळे 11 तालुक्यातील ग्रामीण राजकारण पुन्हा तापणार आहे.
जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच निवड 3 टप्प्यांत म्हणजे 9 ते 11 फेब्रुवारीला होणार आहे. यामुळे 13 तालुक्यांतील ग्रामीण राजकारणासह 10 लाखांवर मतदार, ग्रामस्थांना गावाचा कारभारी कोण होतो याचे वेध (काहींना वेड) लागले आहे. सर्वांचे लक्ष्य व लक्ष सरपंच निवडीकडे लागले असतानाच जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त जागांच्या संभाव्य निवडणुकीचे पडघम देखील वाजायला लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करून टाकलाय! यामध्ये भिंगारा (ता. जळगाव जामोद) ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, नुकतेच पार पडलेल्या 527 ग्रामपंचायतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागा व अन्य रिक्त जागांचा समावेश आहे. बुलडाणा व सिंदखेड राजा वगळता अन्य 11 तालुक्यातील या जागा आहेत. यासाठी 15 जानेवारी 2021 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सरपंच निवडीची अंतिम टप्प्यातील धामधुम सुरू असताना 11 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना प्राप्त झाल्यावर 18 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे चालू महिन्यातच निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.