जिल्ह्यातील पुढील निवडणुकांतही दिसणार “महाविकास आघाडी’; मात्र जिथे ही बाब अशक्‍य तिथे मैत्रीपूर्ण लढती!; शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची स्पष्टोक्ती

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ आहे. यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडी करूनच लढाव्या असा सामूहिक सूर आहे. येत्या लढतीत जिल्ह्यातही शक्यतो आघाडीनेच निवडणुका लढण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी हे अशक्य ठरल्यास तिन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती …
 

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ आहे. यामुळे नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडी करूनच लढाव्या असा सामूहिक सूर आहे. येत्या लढतीत जिल्ह्यातही शक्यतो आघाडीनेच निवडणुका लढण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी हे अशक्य ठरल्यास तिन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली.

नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार क्षेत्राच्या निवडणुका पार पडणार आहेत. डिसेंबरच्या आसपास 11 नगर परिषदा व नगरपंचायती तर नवीन वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद व 13 पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. याशिवाय बाजार समित्या, खरेदी विक्री संघ, सोसायट्याच्या निवडणुकासुद्धा आहेत. या आणि सध्या सुरू असलेल्या सेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी “बुलडाणा लाईव्ह’शी बोलताना ही शक्यता बोलून दाखविली.

जिल्ह्यातील आघाडीचे 3 घटक पक्ष या लढती एकत्र लढतील, असा आशावाद त्‍यांनी व्‍यक्‍त केला. जिल्ह्यातील 13 तालुक्यांतही या लढती आघाडी करून लढण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या तालुक्यात वा ठिकाणी एकमत झालेच नाही तर काय? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता बोलून दाखविली. आजअखेर तरी यासंदर्भात तिन्ही पक्षांची कोणतीही बैठक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपचा सफाया करण्यासाठी तिन्ही पक्षांनी आघाडी करावी असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र आंदोलने करीत असून, अभियान राबवत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की सत्तेत एकत्र असले तरी या पक्षांना आपला विस्तार करण्याचा व संघटन वाढविण्याचा अधिकार असल्याचे आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाव्य आघाडीत ही बाब अडचण ठरणार नाही, असा दावा त्यांनी बोलून दाखवला.