जिल्हावासियांनीच उधळला “भारत बंद’; निषेध अन्‌ निवेदनांपुरताच दिसला…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेला व भाजप विरोधी जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला भारत बंद जिल्हावासियांनी उधळून लावल्याचे चित्र आज, २७ सप्टेंबरला दिसून आले. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिला होता. मात्र निवेदने व निदर्शने वगळता रोजच्या व्यवहारांवर या …
 
जिल्हावासियांनीच उधळला “भारत बंद’; निषेध अन्‌ निवेदनांपुरताच दिसला…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेला व भाजप विरोधी जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला भारत बंद जिल्हावासियांनी उधळून लावल्याचे चित्र आज, २७ सप्टेंबरला दिसून आले. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिला होता. मात्र निवेदने व निदर्शने वगळता रोजच्या व्यवहारांवर या बंदचा काहीच परिणाम झाला नाही.

जिल्हावासियांनीच उधळला “भारत बंद’; निषेध अन्‌ निवेदनांपुरताच दिसला…!

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे, शेतकऱ्यांच्‍या मालाला भाव देण्याकरिता एमएसपीचा कायदा करावा, कामगारांच्या विरोधातील कायदे रद्द करावे या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. डाव्या विचारसरणीचे सर्वच पक्ष, विविध कामगार संघटना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या आंदोलनात उडी घेतली होती. काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढून कार्यकर्त्यांना भारत बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. मात्र निवेदन देऊन फोटो काढण्यापुरता राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत बंद आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलनात भाजप विरोधी पक्षाची एकजूट दिसली नाही. आज भारत बंद होता हे आम्हाला माहितीच नव्हते, अशी प्रतिक्रिया बुलडाणा येथील व्यावसायिकांनी “बुलडाणा लाइव्ह’ला दिली.

बुलडाणा येथे जयस्तंभ चौकात काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर डाव्या पक्षांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मलकापुरात आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसचे ॲड. साहेबराव मोरे, रशीद खान जमादार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. चिखली येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहर व तालुका काँग्रेसने मोटारसायकल रॅली काढली. पायी फिरून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. रॅली पुढे गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडून बंदला पाठिंबा नसल्याचे दाखवून दिले.