आल्या आल्या पाटलांचा “पदा’ने अभिषेक!; निष्ठावंतांच्‍या हाती गाजरं!!; कुटेंचा प्रभाव रोखण्याची क्षमता खरंच आहे यांच्‍यात?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसेनजीत पाटील यांनी गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि काल, २४ ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपद बहाल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी उपस्थित होते. आल्याआल्याच पाटलांना प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याने जळगाव जामोद येथील निष्ठावंतांना मात्र …
 
आल्या आल्या पाटलांचा “पदा’ने अभिषेक!; निष्ठावंतांच्‍या हाती गाजरं!!; कुटेंचा प्रभाव रोखण्याची क्षमता खरंच आहे यांच्‍यात?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसेनजीत पाटील यांनी गेल्याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि काल, २४ ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपद बहाल करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यावेळी उपस्थित होते. आल्याआल्याच पाटलांना प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याने जळगाव जामोद येथील निष्ठावंतांना मात्र धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, त्यानंतर काँग्रेस असा प्रवेश करून पुन्हा पाटील राष्ट्रवादीत परतले आहेत. २००९ आणी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारिपच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांना आमदारकीने थोडक्यात हुलकावणी दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळविला खरा मात्र काँग्रेसच्या उमेदवारीची माळ पडली ती स्वाती वाकेकरांच्या गळ्यात. उमेदवारीचे अमिष दाखवून काँग्रेसने विश्वासघात केल्याची त्यांची भावना झाल्याने मोठ्या जोशात त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मात्र दोनच दिवसांत अर्ज मागे घेतला. तेव्हापासून ते नेमके कोणत्या पक्षात होते हेच कळत नव्हते.

महिनाभरापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्‍यानंतर लगेचच प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आहे. काँग्रेसला इथे पराभवच पहावा लागत असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जामोद मतदारसंघावर दावा ठोकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या मुद्यावरून आघाडीत लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळसुद्धा विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. २०१९ ला “वंचित’च्या तिकिटावर त्यांनी ३० हजार मते घेतल्याने त्यांचाही आत्मविश्वास वाढला. शेगावचे सहकार नेते पांडुरंगदादा पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

“राष्ट्रवादी’ची ताकद किती..?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळी लढली होती.त्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रामविजय बुरंगले यांनी तिसऱ्या क्रमाकांची ३६ हजार ४६१ मते घेतली होती. राष्ट्रवादीकडून प्रकाश ढोकणे मात्र सहाव्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना ६ हजार ५६ मते मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद किती याचा दाखला म्हणून २०१४ च्या निवडणुकीचे उदाहरण काँग्रेसकडून दिले जाऊ शकते. या मतदारसंघावर अधिराज्य गाजवणाऱ्या संजय कुटेंची ताकद प्रत्येक निवडणुकीत वाढत असून २०१४ ला ६३ हजार ८८८ मते घेणाऱ्या कुटेंनी २०१९ ला तब्बल १ लाखांवर मते घेतली होती. कुटेंच्या वाढत्या प्रभावाला रोखण्याची जबाबदारी काँग्रेसला मिळणार की राष्ट्रवादीला? याचे उत्तर मात्र अद्याप तरी अनुत्तरीतच आहे!