आमदार श्वेताताई महाले यांच्या आंदोलनाला अखेर यश!; महावितरणच्या मनमानीला वेसन!!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली व बुलडाण्यात वीज महावितरण कार्यालयासमोर केलेले ठिय्या आंदोलन आणि बिलांची केलेली होळी याशिवाय गेल्या काही दिवसांत वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वेसन लागलीच.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज, 2 मार्चला विरोधी पक्षांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर आणि सभागृहातही जोरदार घोषणाबाजी करत सामान्यांची वीज न कापण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनातही आमदार महाले पाटील या अग्रणी होत्या. हे आंदोलन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्त्वात झाले. कोणत्याही घरगुती वीज जोडणी कट करण्यात येणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने राज्यभरात भारतीय जनता पक्षातर्फे सरकार विरोधातील आंदोलनाला यश आल्याचे मानले जात आहे. लॉकडाउन काळापासून थकीतअसलेल्या वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीज जोडणी कट करण्याची धडक मोहीम सुरू केली होती. त्यामुळे राज्यभर आक्रोश निर्माण झाला आहे.