व्वा मानल नरुभाऊ..! राजकीय परिपक्वता अन् प्रगल्भता म्हणतात ती यालाच! नरेंद्र खेडेकरांनी गाठले रविकांत तुपकर यांचे कार्यालय, तुपकरांची गळाभेट घेतली!

पाऊण तास चाय पे चर्चा! नेमकं काय बोलणं झालं? बातमीत वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...झोपेतून उठल्यावर डोळे चोळत चोळत बातमी वाचत असाल तरी तुम्ही जे वाचताय ते पक्क खरं हाय..अर्थात हल्लीच्या राजकारणात एवढी सभ्यता दुर्लभ झाली असल्याने तुमचा स्वतःचा डोळ्यांवर विश्वास बसत नसला तरी नरुभाऊंनी दिलं जीत लिया एवढं नक्की हाय..काल २७ एप्रिलच्या रात्री पावणेआठ वाजता उबाठा चे लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी बुलढाण्यातील चिखली रोडवरील रविकांत तुपकर यांचे कार्यालय गाठले..ज्यांनी विरोधात लोकसभा निवडणूक लढवली ते नरुभाऊ तुपकर यांच्या कार्यालयात जात असताना तुपकर यांचे कार्यालयीन कर्मचारी, परिसरात असलेले तुपकर समर्थक क्षणभर अवाक् झाले पण तुपकर यांच्या केबिन मध्ये जाताच दोघांनी कडाडून गळाभेट घेतली.."झालं गेलं पार पडलं..निवडणूक संपली..आता ज्याच जमेल त्यानं लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढायच.. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन काम करायचं" असा अलिखित करारच या भेटीत नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्यात झाला.."पाहून घेईल, शिकार करीन..अशा धमक्यांनी गाजलेल्या ,तणावपूर्ण झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील उत्तरार्ध हा नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्या दिलखुलास भेटीने राजकीय परिपक्वतेचे, प्रगल्भतेचे दर्शन घडवणारा ठरला.
 बुलडाणा लोकसभेची यंदाची निवडणुक जाम गाजली. प्रचारकाळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अर्थात १५ वर्षे सत्ताधारी असल्याने खा.जाधव यांच्यावर टीका होणे हे विरोधकांकडून साहजिक होते, लोकशाहीत ते काही गैर नाही..मात्र टीका टिप्पणी करतांना ती व्यक्तिगत पातळीवर होऊ नये हा संकेत पाळायचा असतो. हल्लीच्या राजकारणात हा संकेत अपवाद वगळता कुणी पाळतांना दिसत नाही.. बर ते असो..मुद्दा आहे नरूभाऊ अन् रविभाऊंच्या भेटीचा..काल अचानक नरूभाऊ रविकांत तुपकर यांच्या कार्यालयात आले.. रविभाऊंनी पण नरूभाऊंचे दिलखुलास स्वागत केले.. दोघांनी गळाभेट घेतली.. गरमागरम चहाचा घोट घशात उतरवत असताना मनसोक्त गप्पा रंगल्या.."२०१९ ला जसं राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी थांबलास तसं यंदा माझ्यासाठी थांबला असता तर लढत सोपी झाली असती" असं नरेंद्र खेडेकर यांनी म्हणताच या भेटीवेळी उपस्थित असलेले सगळेच खळाळून हसले..
त्यावर यंदा लढत गरजेचीच होती असं तुपकर म्हणाले. तुपकर यांनी अपक्ष असताना सुद्धा दिलेली लढत जोरदार अन् दमदार होती याबद्दल खेडेकर यांनी तुपकर यांचे कौतुक केले.जर मी संसदेत गेलो तर आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढता ते प्रश्न मी संसदेत नक्की उचलून धरीन असा शब्द यावेळी खेडेकर यांनी तुपकर यांना दिला. दोघांनी एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या..शेवटी नरेंद्र खेडेकर यांना सोडण्यासाठी तुपकर त्यांच्या कार्यालयाबाहेरील चिखली रोडवर आले, रस्त्यावर देखील दोघांमध्ये १५ ते २० मिनिटे चर्चा झाली..काल जे दोघे एकमेकांच्या विरोधात लढते ते एकमेकांना भेटत असल्याचे पाहून चिखली रोडवरून येणे जाणे करणाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला..शेवटी काय तर नरूभाऊ आणि तुपकरांनी दाखवली ती राजकीय परिपक्वता...