कोण होणार पदवीधरांचा आमदार.. धिरज लिंगाडे की रणजित पाटील? मतमोजणीला सुरुवात...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान झाले. दरम्यान आज, २ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. १ लाख २ हजार ४०३ मतपत्रिकेंची मोजणी करायची असल्याने निकाल बाहेर यायला बराच उशीर लागण्याची शक्यता आहे. अमरावती बडनेरा मार्गावरील गोडावून मध्ये ही मतमोजणी होत आहे.

महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे  आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात अमरावती पदवीधर मतदारसंघात काट्याची टक्कर झाली. मतमोजणी पूर्वी दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होईल असे दावे केले आहेत. अर्थात पदवीधरांचा आमदार कोण हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकते.

आधी एकूण मतपत्रिका मोजून त्यातून वैध मतांची संख्या ठरवण्यात येते. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा ठरवण्यात येतो. कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्यास मग दुसऱ्या पसंतीची मते मोजल्या जातात, त्यातून निर्णायक निकाल समोर न आल्यास तिसऱ्या पसंतीचे मते मोजण्याची सुद्धा गरज निर्माण होऊ शकते. दरम्यान ही प्रक्रिया लांबलचक असल्याने पदवीधरांचा आमदार कोण हे कळण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.