रविभाऊ जिंकल्यावरच चप्पल घालणार, तुपकर समर्थकाचा अनोखा संकल्प! एक हाताने कार चालविणारा सारथी म्हणतो गुलाल घेतल्यावरच इलाज, सिंदखेडराजा मधील कार्यकर्त्यांचा जिद्दबाज प्रचार
Updated: Apr 5, 2024, 15:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक म्हणजे प्रचार ओघाने आलाच. सर्वच कार्यकर्ते ते करतातच. मात्र रविकांत तुपकरांच्या चार जिद्दबाज कार्यकर्त्यांचा प्रचार अफलातून असाच म्हणावा लागेल.
हे शूर मावळे एकाच गावचे आहेत. त्यातील राम वसंतराव देवरे याने मागील एकदीड महिन्यापासून पायात चप्पल घालणं सोडलं! सध्या सूर्य आग ओकू लागला आणि सिंदखेडराजा तालुक्यातील तापमान ४२ डिग्रीच्या आसपास आहे. जमीनपण तापली आहे. या भीषण तापमानातही ह्यो गडी बिना चप्पल, गावोगावी फिरत आहे. रविभाऊ लोकसभा जिंकले, खासदार झाले, गुलाल अंगावर घेतल्यावरच पायात चप्पल घेईल. राम भाऊचा असा अनोखा निर्धार अन अनोखे 'अनवाणी व्रत! सोबतीला संदीप देवरे, अनिल देवरे आणि गजानन डीघोळे हे जिवाभावाचे सवंगडी. सगळे काळ्या आईची सेवा करून पिकं घेणारे युवा शेतकरी. मात्र तुपकरांची रथ यात्रा सुरू झाल्यापासून ते २६ एप्रिलला होणाऱ्या मतदान पर्यंत त्यांनी' सुट्टी' घेतली आहे.
आमच्यासाठी, जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करणारा आमचा नेता रविभाऊ लोकसभा लढतोय. मग त्यासाठी तर एवढं करावंच लागेल अशी या चमुची भूमिका आहे. डीघोळे यांची कार, सर्वांनी मिळून त्यात इंधन टाकायचे आणि सकाळी सहाला प्रचाराला भिडायचं अशी त्यांची स्टाईल. सोबतीला घरच्या शिदोऱ्या, नाहीतर कोणत्याबी पाव्हन्याच्या दोन घास खायचे अन पुढच्या गावाला सुटायचं. राम ला तर पायाला आलेल्या फोडाची, वेदनांची बी काळजी नाही!
एक हाताने सारथ्य!
दरम्यान या कारचा चालक मालक म्हणजे गजानन डीघोळे म्हणजे लय भारी! खांद्याची नस दबल्याने, इलाज घेऊनही त्याचा उजवा हात ३ वर्षांपासून निकामी आहे.मात्र हा पठ्ठा एका हाताने मारुती अल्टो कार चालवितो.बारा तेरा तास प्रचार केल्यावर ही टीम माहेरखेड ला रात्री बेरात्री परत येते अन पहाटे दिस उजाळला की प्रचाराला भिडते...