ते प्रशासक आहेत नगरपालिकेचे मालक नाही! आमदार धिरज लिंगाडेंनी घेतली नगरपालिका प्रशासनाची बैठक; म्हणाले, कुण्या अधिकाऱ्याला त्रास द्यायचा माझा स्वभाव नाही पण....
बुलडाणा शहरात अनेक ठिकाणी शासकीय जागांवर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. प्रशासकांना तसे अधिकार आहेत का? कुठल्याही शासकीय जागेवर नगरपालिकेला देखील बांधकाम करायचे असेल तर शासनाची परवानगी घ्यावी लागते.मात्र तशा कोणत्याही परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. प्रशासक आपल्याला तसे अधिकार असल्याचे सांगतात.मात्र त्यांना तसे अधिकार नाहीत ते प्रशासक आहेत मालक नाहीत असे आमदार लिंगाडे म्हणाले. शहरात पाणीपुरवठ्यात अनियमितता आहे.
काही वॉर्डात दररोज पाणी तर काही वॉर्डात ८ - ८ दिवस पाणी येत अशी अवस्था आहे.शहरात स्वच्छता होत नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साफसफाईचे कंत्राट कुणाला दिले आहे याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे लिंगाडे म्हणाले. आज ,बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांना आठ दिवसांचा वेळ दिलाय. त्यात त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही तर सभागृहात याबद्दल आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. कुण्या अधिकाऱ्याला त्रास देणे माझा स्वभाव नाही पण प्रशासकाने प्रशासकासारखे रहावे असेही आमदार लिंगाडे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.