बिगूल वाजला! सव्वाशे ग्रामपंचायतींच्या लढती रंगणार!!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या रणसंग्रामापाठोपाठ जिल्ह्यातील 124 ग्रामपंचायतींमध्ये खास ग्रामीण लढतीचा थरार रंगणार आहे. सदस्यांच्या तब्बल 166 पदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासंदर्भात "बुलडाणा लाइव्ह'ने 15 नोव्हेंबर रोजीच्या वृत्तात या निवडणुका चालू महिन्यातच घेण्यात येतील, असे भाकीत व्यक्त केले होते. ते अचूक ठरले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज राज्यातील 4554 ग्रामपंचायतींच्या 7130 रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यात बुलडाणा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींच्या 166 पदांचा समावेश आहे. घोषित कार्यक्रमानुसार 22 नोव्हेंबरला 13 तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार असून, 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येतील. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येणार असून त्यानंतर रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 22 डिसेंबरला मतमोजणी झाल्यावर निकाल घोषित होणार आहे. दरम्यान, यात मेहकर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 31, चिखलीतील 11 ग्रामपंचायतींच्या 15, मोताळ्यातील 14 ग्रामपंचायतींच्या 15, नांदुऱ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या 18, मलकापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या 13, खामगावमधील 15 ग्रामपंचायतींच्या 22 रिक्त सदस्य पदांकरिता या पोटनिवडणुका रंगणार आहेत. जळगाव जामोदमधील 8 ग्रामपंचायतींच्या 14, शेगाव व लोणारमधील प्रत्येकी 8 ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी 8, सिंदखेड राजामधील 4 ग्रामपंचायतींच्या 4, देऊळगाव राजा मधील 5 ग्रामपंचायतींच्या 6 तर बुलडाणा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींच्या 2 रिक्त जागांसाठी लढती रंगणार आहे.
वातावरण तापले...
निवडणुका लागल्याने 123 ग्रामपंचायत क्षेत्रातील वातावरण व राजकारण कडाक्याच्या थंडीतही तापले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून गाव पुढारी अन् इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. ऐन रब्बीच्या हंगामात ग्रामीण भागात लढती रंगणार असून, आतापासूनच या लढती लक्षणीय ठरल्या आहेत.