शेतकरी, शेतमजुरांचा आक्रोश उद्या सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर धडकणार! उबाठा शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन;

झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे दिलीप वाघ यांचे आवाहन....

 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिक विम्याचे पैसे, घरकुलाचे अनुदान यासह विविध मागण्यांना घेऊन उबाठा शिवसेनेचा आक्रोश मोर्चा उद्या,२५ सप्टेंबरला सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. सरकारच्या उरात धडकी भरवण्यासाठी या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांनी केले आहे.
 सिंदखेडराजा तालुक्यात दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा निघाली होती. तालुक्यातील प्रत्येक गावात या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आता या यात्रेचा समारोप उद्याच्या आक्रोश मोर्चाने होणार आहे. दिलीप वाघ व त्यांच्या टीमने अतिशय जय्यत तयारी या मोर्चाची केली आहे. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, सह-संपर्कप्रमुख छगन मेहत्रे,आशिष रहाटे ,उपजिल्हाप्रमुख बद्री बोडखे, सिंदखेडराजा तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, देऊळगाव राजा तालुका प्रमुख दादाराव खार्डे, सिद्धेश्वर आंधळे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल,त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकेल. तहसील कार्यालयावर या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर होईल, सभेनंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना पाठवण्यात येईल.
सरकारच्या उरात धडकी भरवण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा...
राज्यातले सरकार झोपलेले आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी उद्याचा आक्रोश मोर्चा आहे. शेतकऱ्यांची संघटित शक्ती सरकारच्या उरात धडकी भरवू शकते. त्यामुळे मायबाप शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन दिलीप वाघ यांनी केले आहे.