शिवसेनेच्या मशाल यात्रेला मोताळ्यातून प्रारंभ! गावागावात निष्ठेची लहर; नरेंद्र खेडेकर म्हणाले, हे आतापर्यंतचे सर्वांत असंवेदनशील सरकार!
जिल्हाप्रमुख बुधवंत म्हणाले,शिवसेनेशी मशाल महाभ्रष्टाचारी सरकारचा धूर काढणार....
Sep 5, 2024, 17:23 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्याचे राज्य सरकार हे आतपर्यंतचे सर्वाधिक असंवेदनशील सरकार आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवण्याचे पाप या सरकारने केले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, मात्र मुख्यमंत्री मिंधेंना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. सोयाबीन कापसाला भाव नाही. दिल्ली दरबारी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी हिम्मत राज्य सरकारची नाही. उद्योगपती तुपाशी आणि शेतकरी उपाशी असे या सरकारचे धोरण आहे. या सरकारच्या विरोधात जनमानसात प्रचंड असंतोष आहे, मतपेटीतून हा असंतोष उफाळून येईल आणि हे महाभ्रष्टाचारी सरकार गाडल्या जाईल असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील १५१ गावांत जाणाऱ्या मशाल यात्रेचा भव्य शुभारंभ आज मोताळ्यातून झाला,त्याप्रसंगी खेडेकर बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, युवानेते संदीप शेळके, तालुका प्रमुख लखन गाडेकर,सुनील घाटे, रामदास सपकाळ, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, शुभम घोंगटे, अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, भागवत शिकारे, तालुका संघटक राजु बोरसे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, आशिष खरात, गणेश पालकर, संजय गवळी, मोहन निमरोट, मोहम्मद सोफियान, अनंता शिप्पलकर, मुकुंदा शिरसागर, किरण हुंबड, संजय रोढे, विष्णू पाटील, निलेश पाटील, राजु सुरडकर , गजानन कुकडे, गुलाबराव व्यवहारे, भास्कर शिंदे, सुधाकर आघाव, शेषराव सावळे, रवी गोरे,समाधान बुधवत, अमोल बुधवत, मधुकर महाले, बाळासाहेब सिनकर, राहूल जाधव, प्रवीण राजपूत, चंद्रसिंग साबळे, दगडू पाटील, दिलीप शेळके, संतोष निंबाळकर, दत्ता सपकाळ, आकाश दांडगे, निर्मलकुमार इंगळे, अनंता पाटील, राजू झुंजारके, सुनील गुंडकर, अमोल नखोद, अनिल कानडजे, यांचेसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली आहे. ५ ते २२ सप्टेंबर दरम्यान मतदारसंघातील १५१ गावांत ही यात्रा जागर करणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी मोताळा शहरात शिवसैनिकांचा उदंड उत्साह पहायला मिळाला. शिवसैनिकांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, अंगावर भगवा दुप्पट्टा आणि भगव्या झेंड्यामुळे मोताळात वेगळाच माहौल तयार झाला होता.
शिवसेनेची मशाल महा भ्रष्टाचारी सरकारचा धूर काढणार..
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले की, शिवसेना ही कायमस्वरूपी समाज हितासाठी काम करते. निवडणुका आल्या म्हणून आम्ही काम करत नाही. हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा मंत्र दिला आहे. त्यामुळे समाज हित डोळ्यासमोर ठेवूनच आमचं काम सुरू आहे, सुरू राहील. आज मायबाप शेतकरी अडचणीत आहेत. रोजगाराचे प्रश्न आहेत, शेतीमालाला भाव नाहीत. घरात पडून असलेल्या सोयाबीन व कापसाचे काय करायचं ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे निवडणुका येतील जातील शेतकरी जगला पाहिजे. आणि निवडणुकांचं काय येऊन बसलात, येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ही जनताच हाती घेणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगून शेतकरी हितासाठी आमचा लढा हा प्राणपणाने सुरू राहील अशी ग्वाही दिली. शिवसेनेची मशाल महाभ्रष्टाचारी सरकारचा धूर काढल्याशिवाय राहणार नाही असेही बुधवंत यावेळी म्हणाले. मोताळा येथून ही यात्रा पुढे सांगळद, तिघ्रा, आडविहीर या नियोजित मार्गाने मार्गस्थ झाली...