शरद पवार तुपकरांना म्हणाले, जिवावर बेतणारी आंदोलने करू नका!
Dec 7, 2021, 19:12 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या महिन्यात केलेले अन्नत्याग आंदोलन देशभर चर्चेचा विषय ठरले होते. आंदोलनानंतर आता तुपकरांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्यासाठी दिल्ली गाठली आहे. आज, ७ डिसेंबर रोजी तुपकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली.
विदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. काही महिन्यांपूर्वी १० - ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी सोयाबीन केंद्राच्या चुकीच्या धोरणाने मातीमोल भावात विकली गेली. सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात किमान ८ हजार प्रतिक्विंटल इतके स्थिर राहावे. यासाठी केंद्राने सोयापेंडीची आयात करू नये या विषयात तुम्ही लक्ष घालून केंद्राकडे यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती तुपकरांनी शरद पवार यांना केली. तेव्हा आपण राष्ट्रवादीच्या खासदारांना व महाविकास आघाडीच्या सर्वच खासदारांना या विषयाला सभागृहात वाचा फोडण्यासाठी सूचना करू, असे पवार म्हणाले. पवारांनी यावेळी तुपकरांच्या तब्येतीची सुद्धा आपुलकीने विचारपूस केली. जीवावर बेतणारी आंदोलने करू नका. तब्येतीला जपा, असा सल्लाही शरद पवारांनी तुपकरांना दिला. यावेळी शेतीविषयक अन्य विषयांवरही तुपकरांनी पवारांशी चर्चा केली. सोयाबीनच्या प्रश्नावर आणखी अन्य काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे तुपकर यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाले.