संदिप शेळकेंनी उभारली परिवर्तनाची गुढी! म्हणाले, ४ जूनला विजयाची गुढी उभारू...
Updated: Apr 9, 2024, 15:08 IST
बुलडाणा: वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करून गुढी उभारली. बुलडाणा शहरातील निवासस्थानी त्यांनी परिवर्तनाची गुढी उभारली. यावेळी उभारण्यात आलेल्या गुढीवर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक घटकांचे विविध फलक लावण्यात आले, संदीप शेळकेंनी उभारलेली ही गुढी लक्षवेधी ठरली.
प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी झाली पाहिजे. पोलीस भरती आणि सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गावोगावी रनिंग ट्रॅक झाला पाहिजे, सोयाबीन कापसाला उत्पादन खर्चापेक्षा दीडपट अधिक भाव मिळाला पाहिजे, जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाले पाहिजे, जिल्ह्याला विशेष दर्जा मिळाला पाहिजे, बुलडाण्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र झाले पाहिजे यासह विविध फलक गुढीवर लावले होते.त्यामुळे गुढी अधिकच आकर्षक दिसत होती.
४ जूनला विजयाची गुढी उभारू...
ही परिवर्तनाची गुढी आहे, ही विजयाची गुढी आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठीची आपली तळमळ आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील जनता आपल्याला १०० टक्के साथ देईल, ४ जूनला आम्ही विजयाची गुढी उभारू असे संदीप शेळके यावेळी माध्यमांशी बोलतांना म्हणाले.