शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढा, नाहीतर..! स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्षांनी उपसले हत्यार..!

 
बिबी( ऋषी दंदाले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय स्टेट बँकेच्या लोणार शाखेने पीक कर्ज नूतनीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बचत खात्याला होल्ड लावले आहेत. ते तात्काळ काढा अन्यथा २८ मार्चला बँकेच्या समोर ठिय्या आंदोलन करू असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेह लाड यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तशा आशयाचे निवेदन बँकेच्या व्यवस्थापकांना लाड यांनी दिले आहे.
 

बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावलेला असल्याने निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनांचे पैसे सुद्धा शेतकरी काढू शकत नाहीत. त्यामुळे दवाखाना, लग्न व इतर महत्वाच्या कामासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घ्यायची वेळ आली असल्याचे लाड यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावण्याचा कोणताही अधिकार बँकांना नसताना ते दडपशाही करीत असल्याचा आरोप लाड यांनी केला. मंगळावर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांना लावलेले होल्ड काढा अन्यथा भारतीय स्टेट बँक त्याच्या लोणार शाखेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा लाड यांनी दिला आहे.