रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या धसक्याने विमा कंपनी वठणीवर! १५ जून पर्यंत ७० कोटी रुपये देण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन; तुपकर म्हणाले,शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही तोवर आंदोलनावर ठाम

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोकशाही मध्ये आंदोलन हे सर्वात मोठे हत्यार आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा देताच निगरगठ्ठ झालेली एआयसी पिकविमा कंपनी वठणीवर आली आहे. एआयसी पिकविमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना दिले आहे. हे रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. मात्र आपला सदर कंपनीवर विश्वास नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. 
सोयाबीन - कापसाला दरवाढ द्यावी, पिकविमा, अतिवृष्टीचे व सततच्या पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, पिककर्जाचे वाटप पेरणीपूर्वी करावे, सी-बील ची अट लावणाऱ्यां व अनुदाला होल्ड लावणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करावी, पेरणी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. परंतु सरकार दुट्टपी धोरण राबवित आहे. त्यामुळे १५ जून पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक मार्केट मधील २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ९ जून रोजी दिला. त्यानंतगर अगदी बुलढाण्यापासून मुंबई पर्यंतचे प्रशासन अर्लट झाले. बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावून आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या, गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला मात्र तरीही आंदोलन करणारच या भूमिकेवर तुपकर कायम होते. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने एआयसी पिकविमा कंपनी वठणीवर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना १२ जून रोजी दिले आहे. परंतु जोपर्यंत हे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तसेच उशिरा तक्रार केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या ११ हजार शेतकऱ्यांच्या व इतर १५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपनी काही निर्णय घेत नाही, अतिवृष्टीची व सततच्या पावसाची नुकसान भरपाई आणि इतर मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनाच्या भूमिकेकर आम्ही ठाम आहोत, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. 
आश्वासन नको...कृती हवी...आंदोलन होणारच
सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना (१,९३,४३१) आतापर्यंत कंपनीकडून १५७ कोटी ८७ लाख रुपये मिळाले आहे. तर आता मुंबईत १६ जून रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या धसक्यामुळेच कंपनीने ७० कोटी रुपये मंजूर केले आहे, पण आम्हाला आश्वासन नको, कृती हवी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोवर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही तुपकरांनी सांगितले आहे.