राहुल बोंद्रे सोमय्यांच्या रडारवर!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पूर्वनियोजित दौरा नसताना भाजपचे फायरब्रॅण्ड नेते किरीट सोमय्या काल, ३० नोव्हेंबरला रात्री अचानक चिखलीत आले. जालना रोडवरील हॉटेल मीरा सेलिब्रेशनमध्ये रात्री साडेदहाला त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. चिखलीकरांनी खाऊ घातले आणि "खुराक'सुद्धा दिला, असे वक्त्यव्य सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केले. हा खुराक म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या २ फाईल मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्या फाईलमध्ये तथ्य आहे. भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला याचे पुरावे देण्याचे काम मी करणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. सोमय्यांच्या विधानामुळे चिखलीचे राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या अनुराधा अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारासंदर्भातील या फाईल बोंद्रे यांच्या जवळच्या नातेवाइकांनी सोमय्या यांच्याकडे दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात राहुल बोंद्रेसुद्धा किरीट सोमय्या यांच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत. यावेळी आमदार श्वेताताई महाले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंह राजपूत, सुरेशआप्पा खबुतरे, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ उपस्थित होते.
महाराष्ट्रात वसुलीचे धंदे...
महाराष्ट्रात फक्त पैसे आणि वसुलीचे धंदे सुरू आहेत. राज्यात २३ महिन्यांत महाविकास आघाडीच्या २८ मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले आहेत. कधी नव्हे एवढे घोटाळेबाज सरकार महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अलिबाबा ४० चोरांच्या सरकारातील ४० मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी सोमय्यांनी केला. सत्तेची भूक आम्हाला नाही. राज्यात वसुलीचे धंदे सुरू आहेत. मंत्री जेलमध्ये, पोलीस जेलमध्ये अशी वेळ महाविकास आघाडी सरकारवर आली आहे. महाराष्ट्राला आम्हाला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे, असे सोमय्या म्हणाले.
शरद पवारांनी दंगलीचे प्लॅनिंग केले...
१२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी २५-३० हजार लोकांच्या गर्दीचे जुलूस निघाले. या गर्दीला कुणी भडकावले?, असा प्रश्न सोमय्या यांनी केला. उत्तरप्रदेशात निवडणुका असल्याने महाराष्ट्रात दंगली घडवून आणल्या, असे विधान शरद पवारांनी केले. दंगल घडविण्यामागे पवारांचे प्लॅनिग दिसते, असे सोमय्या म्हणाले. १९९२-९३ च्या दंगलीवेळी हिंदू मार खाणार नाही अशी भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती; मात्र आता उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत हिरवे झेंडे घेऊन फिरत असल्याचे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या काल, ३० नोव्हेंबर रोजी अमरावतीला गेले होते. आज १ डिसेंबर रोजी त्यांना जालना येथे जायचे असल्याने ते चिखलीमार्गे आले. त्यामुळे पूर्वनियोजित दौरा नसतानासुद्धा ते चिखलीत थांबले. आघाडी सरकारवर तोफ डागली. रात्री उशिरा ते जालन्याकडे रवाना झाले.