स्थगित नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी पुन्हा राजकारण तापणार; 8 दिवसांची ‘कसोटी’! मतदान २० डिसेंबरला; प्रचार पुन्हा पेटणार...
निवडणूक आयोगाने या स्थगित निवडणुकांसाठी छाननी व पुढील प्रक्रिया नव्याने जाहीर केली असली तरी उमेदवार बदलणार नाहीत. आधी अर्ज दाखल केलेलेच उमेदवार रिंगणात राहतील किंवा इच्छुकांना अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे नव्या उमेदवारांना यात संधी मिळणार नाही.
आधीच निवडणूक प्रचारामुळे उमेदवारांचा खर्च वाढलेला. त्यात आता २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या वाढीव प्रचाराचा भार त्यांच्या माथी पडणार आहे.खर्चाची मर्यादा मात्र तीच असल्याने, अनेक उमेदवारांपुढे नवा आर्थिक पेच उभा राहिला आहे.
बॅनर–पोस्टर, ऑडिओ क्लिप्सही बदलाव्या लागणार
शहरात लावलेले प्रचार बॅनर, पोस्टर, प्रसिद्धपत्रके यांवरील दिनांक बदलल्याने उमेदवारांना सर्व छापील साहित्य पुन्हा छापण्याची वेळ आली आहे.तयार केलेल्या ऑडिओ–व्हिडिओ क्लिप्सचेही संपादन किंवा पुनर्निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा ताण वाढला आहे.
२० डिसेंबरपर्यंत ‘मतदार सांभाळा’ मोहीम!
स्थगित प्रभागांतील उमेदवारांना आता २० तारखेपर्यंत प्रभागातील मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा लागणार आहे. मतदान पुढे ढकलल्याने थंडावलेला प्रचार पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
