नगरपंचायतीचे मतदान शांततेत! मोताळ्यात ७९% तर संग्रामपूरमध्ये ८३.४५% मतदान
Dec 22, 2021, 10:26 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी काल, २१ डिसेंबरला मतदान शांततेत पार पडले. या दोन्ही नगरपंचायतींमध्ये सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही ठिकाणी १३- १३ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. मोताळ्यात ७९% तर संग्रामपूरमध्ये ८३.४५% मतदान झाले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.
संग्रामपूर व मोताळा नगरपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या प्रत्येकी ४ राखीव जागा वगळता अन्य जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी १३-१३ जागांसाठी निवडणूक झाली. मतमोजणी १९ जानेवारी २०२२ रोजी तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे, अशी माहिती नगर प्रशासन विभागाकडून प्राप्त झाली आहे. संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी स्त्री मतदार १९६५ व पुरुष मतदार २१०१ असे एकूण ४०६६ मतदार होते. त्यापैकी १७९८ पुरुष मतदारांनी व १५९५ स्त्री मतदार असे एकूण ३३९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मोताळा नगरपंचायत निवडणुकीसाठी स्त्री मतदार २९६८ तर पुरुष ३२९० असे एकूण ६२५८ मतदार होते. त्यापैकी स्त्री २१४१ व पुरुष २३९६ असे एकूण ४५३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.