मोताळ्यात ताईंचं जमलं; पण संग्रामपुरात भाऊंचं हुकलं! परिणाम अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुंबईत आज, २७ जानेवारीला काढण्यात आलेले आरक्षण जिल्ह्यात कही खुशी कही गम असे संमिश्र वातावरण तयार करणारे ठरले! मोताळ्यात आरक्षणाचे दान अनुकूल पडल्याने माधुरीताई देशमुख यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मात्र संग्रामपुरात आरक्षणाचे फासे उलटे पडल्याने शंकरलाल पुरोहित यांची संधी हुकली! त्यामुळे त्यांच्या समर्थकांत काहीसे नाराजीचे वातावरण आहे.

प्रत्येकी १७ सदस्यीय मोताळा व संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनुक्रमे काँग्रेस व प्रहार- संग्रामपूर मित्र परिवार युतीने बहुमत मिळविले आहे. यामुळे सत्ता मिळविण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मोताळ्यात अध्यक्षपदासाठी माधुरीताई पुरुषोत्तम देशमुख तर संग्रामपुरात प्रहार युतीचे शंकरलाल मोहनलाल पुरोहित ही नावे जवळपास निश्चित मानली जात होती.

मात्र आज मुंबईत निघणाऱ्या आरक्षण सोडतीने मजेदार अडचण करून टाकली. संग्रामपूर अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले. यामुळे पुरोहित यांचे हमखास वाटणारे अध्यक्षपद दूर सारले गेले आहे. मेहनतीने हातातोंडाशी आणलेला घास दुरावला, असे म्हणता येईल. कदाचित ते उपाध्यक्षपद स्वीकारतील, अशी शक्यता आहे. परिणामी प्रहार संग्रामपूर मित्र परिवारच्या उषा सिद्धार्थ सोनुने यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार असून ही त्यांच्यासाठी राजकीय लॉटरीच ठरली आहे. दुसरीकडे मोताळाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला) असे निघाल्याने मोताळ्यात ठरल्याप्रमाणे माधुरी देशमुख यांची वर्णी लागणार हे निश्चित मानले जात आहे.