मोताळा नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहीता लागू !

मतदान केंद्रांपासून 200 मीटर आत कोणताही मंडप, कार्यालय उभारण्यास बंदी; जागा मालकाच्या लेखी संमतीशिवाय पोस्टर्स, बॅनर लावू नये!
 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 22 डिसेंबरपर्यंत आदर्श आचार संहीता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये या दृष्टीकोनातून भारतीय दंड संहीताचे कलम 188, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  मोताळा नगर पंचायत क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यापासून 200 मीटरच्या आत कोणताही मंडप तथा कार्यालय उभारण्यास बंदी असणार आहे.

जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतील तेथे अशा मतदान केंद्रांच्या गटासाठी त्या जागेच्या 100 मीटरचे अंतरापलीकडे उमेदवाराच्या केवळ एकच मंडपाला परवानगी आहे. उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा आहे त्या ठिकाणी 3 x 4.5 फुटाचा एक बॅनर वापरता येणार आहे. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील अशा प्रत्येक उमेदवाराने ज्या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत, त्या मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक याबाबतची लेखी माहिती संबंधित निवडणूक अधिकऱ्यांना आगाऊ कळवावी. असे मंडप उभारताना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे.

मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजनाकरीताच केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहिजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. मतदान केंद्रातून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप सांभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करण्यास किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष, संघ, संस्थाने उमेदवार, प्रतिनिधी यांनी सार्वजनिक जागा, शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे इमारत व जागेवरील लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स कट आऊट त्वरित काढून टाकावीत. तसेच खाजगी जागा, इमारतीवरील संबंधीत जागा मालकाचे लेखी संमतीशिवाय लावलेली भिंतीपत्रके, फलक, पोस्टर्स, बॅनर्स, कट आऊट त्वरित काढून टाकावीत.

मतदानाचे दिवशी मतदान केंद्र व परीसरात जमाव करण्यास, मतदारांना घाबरविण्यास, बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करणे, वाहनांचा प्रवेश, मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश मतदानाशी संबंधित अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरीक्षक यांना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे मलकापूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मनोज देशमुख यांनी कळविले आहे.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व बुलडाणा येथील मतदान केंद्रांची पाहणी आज, 6 डिसेंबर रोजी केली. दरम्यान विश्राम गृह बुलडाणा येथे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे आदींसमवेत निवडणुकीसंदर्भात चर्चाही करण्यात आली. मतदारसंख्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रांवरील साहित्य, प्रशिक्षण आदींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. जळगाव जामोद येथे तहसीलदार शीतल सोलाट, नांदुरा येथे तहसीलदार राहुल तायडे, बुलडाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसीलदार राहुल तायडे आदी  उपस्थित होते.