नगराध्यक्षा सौ. प्रिया बोंद्रेंनी फेटाळले भ्रष्टाचाराचे आरोप!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपने आमच्यावर केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ते मान्य नाहीत, आरोपांचे आम्ही खंडन करतो. भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करूनच दाखवावेच, असे आव्हान चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी भाजपला दिले आहे. २० ऑक्टोबरला भाजपने पक्षातून काढून टाकल्यानंतर आज, २२ ऑक्टोबरला प्रियाताई बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
सौ. प्रियाताई बोंद्रे या वेळी म्हणाल्या, की शहरात झालेल्या विकासकामांमुळे स्थानिक भाजप नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. वाढती लोकप्रियता पचनी न पडल्याने भाजप शहराध्यक्षांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा केविलवाणा प्रयत्न केला. महिला नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे हे चिखली भाजपा नेतृत्वाला शोभत नाही, असे त्या म्हणाल्या. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी जी आश्वासने दिली होती ती जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.२०१६ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजपची सत्ता असताना मोठा निधी खेचून आणून चिखलीत विकासकामे केली. त्या कामांचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत झाला. भाजप नेत्यांनी नैराश्यातून हे बिनबुडाचे आरोप केले आहेत. विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरूनच आपल्याला पक्षातून काढून टाकण्यात आले, असेही सौ. बोंद्रे म्हणाल्या.
राज्यात आघाडी सरकार असतानाही नगरपालिकेला निधी येतो म्हणून...
राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना व नगरपालिकेत भाजपची सत्ता असताना नगरपालिकेला निधी मिळतो तरी कसा, असा प्रश्न भाजप नेत्यांना पडल्यामुळे आमच्याबद्दल त्यांच्या मनात विरोध होता. व्यक्तिगत द्वेषातून आणि सूडबुद्धीने भाजप शहराध्यक्षांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या भरवशावर जनतेच्या दरबाराला सामोरे जाणार असल्याचे नगराध्यक्षा सौ. बोंद्रे म्हणाल्या. नगराध्यक्षांनी केलेल्या विकासकामांच्या आधारावर भाजपने मते मागू नयेत. स्वकर्तृत्वातून लोकहिताची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचा कुटील डाव माझ्याविरोधात भाजपने रचला आहे. आता जनताच न्यायनिवाडा करेल, असेही त्या म्हणाल्या.
रुपयाचाही भ्रष्टाचार नाही...
नगरपरिषदेत एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही. भाजपने ज्या २३ कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. त्यातील कामे नियमानुसार झाली आहेत. यावेळी तीन मोठी कामे दर्जेदार झाली नव्हती, असे मान्य करत ती कामे करणाऱ्या कंत्राटदारांना अजूनही बिल दिलेले नाही. काम दर्जेदार केल्याशिवाय बिल देण्यात येणार नाही, असे यावेळी कुणाल बोंद्रे म्हणाले. नगराध्यक्षा महिला असल्यामुळे पती या नात्याने सोबत राहत होतो. मात्र नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच कामे होत होती. भ्रष्टाचार झाल्याबाबत कोणत्याही नगरसेवकाने लेखी किंवा तोंडी तक्रार दिली नाही, असेही कुणाल बोंद्रे म्हणाले. आता कोणत्या पक्षात जायचे हे ठरले नाही मात्र कार्यकर्त्यांचा विचार ठरवून पुढील भूमिका ठरवण्यात येईल. मात्र भाजपने आपली बाजू एेकून न घेता काढून टाकल्याने भाजपच्या वरिष्ठांकडे दाद मागणार नाही व पुन्हा भाजपात परतणार नाही, असे कुणाल बोंद्रे म्हणाले. यावेळी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असल्याने ते काँग्रेसमध्येच जातील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
गोपाल देव्हडे बोंद्रे दाम्पत्यात्यासोबत
बोंद्रे दाम्पत्याला निलंबित करण्याच्या वेळी नगरसेवक गोपाल देव्हडेंना निलंबित करणार का, असा प्रश्न भाजपला विचारण्यात आला होता. मात्र त्यावर तो घरातला विषय आहे त्यांना समज देण्यात आल्याचे भाजपच्या शहराध्यक्षांनी सांगितले होते. आज कुणाल बोंद्रे यांनासुद्धा कुणी नगरसेवक सोबत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला मात्र यावर योग्यवेळी खुलासा करण्यात येईल, असे कुणाल बोंद्रे म्हणाले. मात्र पत्रकार परिषद सुरू असतानाच पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हडे तेथे आले व कुणाल बोंद्रे यांच्या बाजूला जाऊन बसले. त्यामुळे गोपाल देव्हडे हे भाजपातून बाहेर पडणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.