मनोज कायंदे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक!
Oct 29, 2021, 08:20 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा असून, त्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातून प्रथमच कुणी थेट प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा ठेवली आहे.
चार वर्षांचा कार्यकाळ असलेल्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ८ वर्षांपासून निवडणूक घेतली जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत विश्वजीत कदम, सत्यजित तांबे विजयी झाले होते. दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील व तगड्या राजकीय घराण्याचे वारसदार असल्याने त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवाराने अर्जही त्यावेळी भरला नव्हता. मात्र आता विदर्भातून प्रथमच उमेदवारी अर्ज गेला आहे, तोही बुलडाणा जिल्ह्यातून. सलग दोनवेळा मनोज कायंदे हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्यही ते आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. नंदाताई कायंदे यांचे ते सुपूत्र आहेत. पक्षाशी कमालीची निष्ठा आणि मुकुल वासनिकांवर असलेली श्रद्धा त्यांना या निवडणुकीत यश मिळवून देते का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.