जळगाव जामोद बाजार समितीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर!; प्रसेनजीत पाटलांकडूनही अनियमिततेची कबुली!!
महाविकास आघाडीतर्फे बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन रमेश पाटील यांनी अनेक गंभीर आरोप केले. शेत खरेदी प्रकरणी शासनाची मान्यता न घेताच आर्थिक व्यवहार करण्यात आले. असे बरेच व्यवहार बाजार समितीने परस्पर केल्याचा आरोप पाटील यांनी केला. शेत जमीन खरेदीचा निर्णय बाजार समितीच्या १४ ऑगस्ट २०१५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा विषय सभेच्या विषय सूचीत समाविष्ट न करता वेळेवर येणाऱ्या विषयांत घेतलेला आहे. त्यामुळे पणन संचालकांनी प्रस्तावाला आवश्यक असलेली परवानगी नाकारली, असे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, तालुकाप्रमुख गजानन वाघ, ॲड. भाऊराव भालेराव, रुपराव पाटील, संजय गोरडे, अजाबराव वाघ, बळीराम पाटील, शेख जावेद, सुपाजी बांगर, विश्वनाथ वाघ, अब्दुल करीम यांची उपस्थिती होती.
प्रसेनजीत पाटील म्हणतात, अपहार नाही अनियमितता...
मुख्य प्रशासकांचे आरोप प्रसेनजीत पाटील यांनी फेटाळले असून, त्यांनीही पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. शेत जमीन खरेदीत कुठलाही अपहार नाही. केवळ अनियमितता आहे, असे ते म्हणाले. बाजार समितीच्या विविध उपयोगासाठी वेळोवेळी शेत जमीन खरेदी करावी लागली. याला संचालक मंडळाची परवानगीही घेतली आहे. बाजार समितीच्या अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली होती.
जमीन मालक निंबाळकर यांना करार करून २८ लाख २ हजार ५०० रुपये एवढी रक्कम अदा केली आहे. त्यानंतर सुखदेव यांच्याशी करार १५ लाख ३० हजार रुपये त्यांना अदा केले आहेत. व्यवहारासाठी परवानगी मिळावी म्हणून पणन संचालकांकडे पाठपुरावासुद्धा केला. पण दोन महिन्यांत मिळणारी परवानगी सहा वर्षांत मिळाली नाही, असे प्रसेनजीत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना लेखी मागणीनुसार रक्कम अदा केली आहे. यात कोणतीही अफरातफर नाही, असे ते म्हणाले. यावेळी बंडू पाटील, पप्पू गावडे, आशिष वायजोडे आदी उपस्थित होते.