विधान परिषद : संचेती, गोडेंनंतर भाजपकडून ही नावे आहेत चर्चेत!
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप -शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून बाजोरिया निवडणूक लढवत होते. यापूर्वीच्या सर्वच निवडणुका ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढले. यंदा मात्र त्यांची स्पर्धा भाजपच्याच उमेदवाराशी होणार आहे. बाजोरिया महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे बाजोरियांच्या विरोधात कोणता उमेदवार योग्य अन् सक्षम राहील याचा विचार भाजपच्या वरिष्ठ स्तरावर सुरू झाला आहे.
अकोला आणि वाशिम जिल्ह्यापेक्षा बुलडाणा जिल्ह्याचे जास्त मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समित्यांचे सभापती या निवडणुकीत मतदान करतात. ही संख्या बुलडाणा जिल्ह्यात ४०५ इतकी आहे. अकोला आणि वाशिमच्या तुलनेत ५० टक्के मतदार बुलडाणा जिल्ह्यातील असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवार देण्याची तयारी भाजपने सुरू केली होती. मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आणि बुलडाण्यातील भाजप नेते योगेंद्र गोडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र दोघेही यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे त्यांनी पक्षाला कळविले. त्यामुळे भाजपने आणखी काही नावांची चाचपणी सुरू केली आहे.
त्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या पक्षसंघटनेची जबाबदारी असलेल्या बावनकुळे यांचे गेल्या काही दिवसांत अकोला- बुलडाणा जिल्ह्यात दौरेही वाढले होते. बाजोरिया यांच्याप्रमाणे बावनकुळे हे सुद्धा "ऊर्जावान' नेते आहेत. सर्वच बाबतीत ते बाजोरियांना तोड देऊ शकतात, असे भाजप धुरिणांना वाटते. अकोला महानगरपालिकेसह अनेक नगरपरिषदांवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्यासारख्या ऊर्जावान नेत्याला भाजप उमेदवारी देण्याची श्यक्यता आहे. याशिवाय अकोल्यातील उद्योगपती वसंत खंडेलवाल यांच्या नावाचाही विचारही भाजप करत आहे. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे जवळचे मानले जातात. याशिवाय संघ परिवाराशी त्यांचा जवळचा संबंध आहे. उद्योगपती असल्याने अर्थसंपन्न असलेल्या वसंत खंडेलवाल यांना बाजोरियांना आव्हान देण्यासाठी भाजप मैदानात उतरवू शकते.