पालकमंत्री म्‍हणतात... ई ट्रायसिकलमुळे दिव्यांग बांधव आत्मनिर्भर!

देऊळगाव राजा येथे दिव्यांगांना ट्राय सिकल वाटप
 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे दिव्यांग व्यक्तींना ई ट्रायसायकलचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे दिव्यांग बांधव स्वतः च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील. ट्राय सिकलचे वाटप दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचं पहिलं पाऊल असून यामुळे दिव्यांग निश्चितच आत्मनिर्भर होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री दिव्यांगांना ई ट्रायसायकल वाटप प्रसंगी बोलत होते.
 

देऊळगाव राजा येथील आर्या लॉन्समध्ये हा कार्यक्रम झाला. दिव्यांगासाठी  ई ट्रायसायकल वाटप व विधवा महिलांना तेजश्री योजनेअंतर्गत आर्थिक मदत, लोक संचलित साधन केंद्र देऊळगाव महीच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आज, २३ ऑक्टोबरला करण्यात आले. पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, की महिलांना आर्थिक संपन्न करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहे. या योजनांना कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन मंडळ असो किंवा राज्य शासन असो निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. नाझेर काझी होते. कार्यक्रमात १६२ दिव्यांगांना ई ट्रायसायकल वाटप करण्यात आले. तसेच महिला बचतगटांना देखील धनादेशाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाँ पठाण, जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, नगराध्यक्ष सुनीताताई शिंदे, तहसीलदार श्याम धनवणे,  माजी जि. प. उपाध्यक्ष गंगाधर  जाधव, गजानन पवार, सौ. सुनिताताई सवडे, पंचायत समिती उपसभापती सौ. कल्याणीताई शिंगणे, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, राजू शिरसाट, अर्पित मिनासे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, अरविंद खांडेभराड, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी सुमेध तायडे, उपजिल्हा विकास सल्लागार विशाल पवार, लेखाधिकारी मुकुंद जहागीर, कुंदन सदाशिव, राजेश शेगोकार उपस्थित होते. बचत गटाच्या महिला पदाधिकारी व दिव्यांग या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुमेध तायडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल पवार यांनी केले.